
Ladki Bahin Yojana Update: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उत्तरार्धाच्या काळात आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) प्रचंड चर्चेत आहे. कधी ती निधीवरुन, कधी निकष आणि पात्रतेवरुन तर कधी लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या विलंबावरुन. आताही ही योजना चर्चेत आहे. कारण, 2025 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील आज (28 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. हा महिना 28 दिवसांचा असल्याने आज समाप्त होतो आहे. त्यामुळे महिना संपला तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप तरी पैसे आले नाहीत. त्यामुळे आज, उद्या म्हणता म्हणता महिना संपला तरी लाभार्थ्यांना कधी मिळणार पैसे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट 3,000 रुपये?
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. योजना सुरु झाल्यापासून सरकारतर्फे राज्यभरातील महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा करते. शक्यतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हे पसै लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झालेले असतात. फेब्रुवारी 2025 मात्र त्यास अपवाद ठरला. आज शेवटच्या दिवशी हे पैसे जमा होतील अशी चर्चा आहे. मात्र, हे वृत्त लिहीपर्यंत तरी हे पैसे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे आढळून आले नाही. दुसऱ्या बाजूला असेही बोलले जात आहे की, राज्य सरकार लाभार्थ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी योजनेच्या अटी, पात्रता आणि निकष काटेकोरपणे पाहून लाभार्थ्यांची निवड करणार आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना वगळून इतरांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे वळते करणार आहे. त्यामुळे लाभासाठी विलंब होतो आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हाप्ता एकत्रच दिला जाईल. दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश)
प्रत्येक वर्षात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतो. तोच धागा पकडत राज्य सरकार फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करु शकते. अर्थात, या सर्व चर्चा आणि शक्यताच आहे. राज्य सरकारकडून त्याबाबत तशी कोणतीही घोषणा अधिकृतपणे करण्यात आली नाही. खरे तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. तर, महिला व बालविकास विभागानेही काही तांत्रिक बाबींमुळे महिलांना पैसे देण्यास विलंब झाला आहे. मात्र, हे पैसे लवकरच देण्यात येतील, असे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र अद्यापही पैसे जमाच झाले नाहीत.