Washing Vegetables In Sewer Water: सोशल मीडियावर सध्या उल्हासनगर (Ulhasnagar) मधील खेमानी भाजी बाजारातील (Khemani Market) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक भाजी विक्रेता गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना (Washing Vegetables In Sewer Water) दिसत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नेटीझन्सकडून विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. उल्हासनगर कॅम्प-2 च्या खेमानी भागात एक बेकायदेशीर भाजी बाजार आहे, जिथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक विक्रेता दूषित गटाराच्या पाण्यात भाज्या बुडवताना आणि बादलीने ते पाणी इतर भाज्यांवर शिंपडतानाही दिसत आहे. या दूषित भाज्या ग्राहकांसाठी किती धोकादायक ठरू शकतात, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या धक्कादायक घटनेमुळे मार्केटमधून भाजीपाला विकत घेणाऱ्यांमध्ये आरोग्याच्या सुरक्षेवरून चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा - फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी काही उपाय; दूर होतील आरोग्याच्या अनेक समस्या)
या व्हिडिओवर सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या स्वच्छतेबद्दल अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर अनेकदा निरोगी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. परंतु, भाज्या दिर्घकाळ ताज्या राहण्यासाठी त्यावर अशा प्रकारचं अस्वच्छ पाणी शिंपडले जात आहे. ज्यामुळे लोकांना आता त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. (हेही वाचा: नेहमी बाहेरचे खाणे? फूड पॉयझनिंग झाल्यास हे करा उपाय व अशी घ्या काळजी)
उल्हासनगरमधील खेमाणी मार्केटमध्ये विक्रेता नाल्याच्या पाण्यात भाजीपाला धुताना; पहा व्हिडिओ
#WATCH | Viral Video Shows Vendor Washing Vegetables In Sewer Water In Ulhasnagar's Khemani Market#Ulhasnagar #Maharashtra #maharashtranews pic.twitter.com/IPFBk3G0q0
— Free Press Journal (@fpjindia) February 28, 2025
या व्हायरल व्हिडिओनंतर स्थानिक राजकीय नेते आणि नागरिक उल्हासनगर महानगरपालिकेकडून (UMC) त्वरित कारवाईची मागणी करत आहेत. नागरिकांनी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून संबंधित विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आणि बाजारपेठेतील स्वच्छतेचे मानक सुधारण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, यूएमसीचे आरोग्य अधिकारी मनीष हिवाळे यांनी हा व्हिडिओ उल्हासनगरमधील खेमाणी येथील असल्याची पुष्टी केली. त्यांनी पुढे सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना कळवले आहे. त्याला शोधल्यानंतर, आम्ही त्याचे जबाब नोंदवू आणि त्यानुसार पुढील कारवाई करू.