Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Fake Doctor In Nagpur: नागपूर (Nagpur) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. पोलिसांनी एका बनावट डॉक्टर (Fake Doctor) वर कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्यक्ती आपल्या मृत वडिलांच्या पदवीचा वापर करून लोकांवर उपचार करत होता. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन (Maharashtra Council of India Medicine) ने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या बनावट डॉक्टरवर नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) आणि पोलिसांनी छापा टाकला आहे. बनावट डॉक्टरच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूरमध्ये महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील एका बनावट डॉक्टरवर कारवाई केली. हा व्यक्ती मृत वडिलांच्या पदवीच्या आधारे रुग्णांवर उपचार करत होता. प्राप्त माहितीनुसार, त्याच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. बनावट डॉक्टर झैद अन्सारी त्याच्या वडिलांच्या मृत्यूपासून रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Bihar Shocker: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केली; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; बोगस डॉक्टर फरार)

वडिलांच्या नावाने बोर्ड लावून करत होता रुग्णांवर उपचार -

पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शन, औषधे आणि सलाईन सापडले. महापालिकेच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बीयूएमएस पदवीधारक साजिद अन्सारी, मोमिनपुरा येथील अन्सार नगरमध्ये प्रॅक्टिस करत होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. यानंतर, त्यांचा मुलगा जैद अन्सारी क्लिनिकमध्ये त्याच्या वडिलांच्या नावाचा बोर्ड लावून संकुलातील नागरिकांवर उपचार करत होता. या प्रकरणी एका अज्ञात नागरिकाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनकडे तक्रार पाठवली होती. (हेही वाचा -Under Qualified and Fake Doctors: बीएमसीच्या रुग्णालयात अपात्र आणि बनावट डॉक्टरांची नियुक्ती; अनेक मृत्यूंची शक्यता, Jeevan Jyoti Trust विरोधात एफआयआर दाखल)

पोलिसांनी क्लिनिकवर टाकला छापा -

दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी क्लिनिकवर छापा टाकला. क्लिनिकच्या बोर्डवर वडील साजिद अन्सारी आणि बहिणीची बीएएमएस पदवी नमूद करण्यात आली होती. बनावट डॉक्टरने त्याच्या बहिणीच्या प्रोव्हिजनल डिग्रीच्या आधारे महानगरपालिका आणि पोलिसांना त्याच्या प्रॅक्टिसबद्दल माहिती दिली.

नागपूरच्या गांधी बाग झोन अंतर्गत येणाऱ्या मोमिनपुरा येथील अन्सार नगरमध्ये कामठी येथे मृत वडिलांच्या आणि बहिणीच्या प्रोव्हिजनल डिग्रीच्या आधारे नागरिकांवर उपचार करणाऱ्या बनावट डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.