प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

Pune Swargate ST Bus Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पार्क केलेल्या राज्य परिवहन बसमध्ये, 26 वर्षीय महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे या व्यक्तीला अटक करण्यात आली. या घटनेनंतर सार्वजनिक संताप उसळला आहे, आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर आता प्रशासनही ॲक्शन मोडवर आले आहे. महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी सर्व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस स्थानकांचे आणि डेपोंचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यांनी जाहीर केले की, खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या सुमारे 15,000 एमएसआरटीसी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे अनिवार्य केली जातील.

राज्यभरातील एमएसआरटीसी डेपोमध्ये पार्क केलेल्या सर्व वापरात नसलेल्या बसेस आणि वाहनांची 15 एप्रिलपूर्वी विल्हेवाट लावण्यात येईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर एमएसआरटीसी बस डेपोमधील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत सरनाईक होते. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. बसेसमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. पोलिसांची मदतीने बसस्थानकात गस्त वाढवण्यात यावी. (हेही वाचा: Pune Swargate ST Bus Rape Case: शिवसेना महिला आघाडी घेणार राज्यातील एसटी डेपोंचा आढावा; तपासल्या जाणार महिलांसाठी असलेल्या सुविधा)

ते पुढे म्हणाले, आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे. जेणेकरून 24 तास त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही. बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक, वाहक यांनी आगारात आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.