अमरावतीमध्ये उमेश आणि उदयपूरमध्ये कन्हैया लाल यांच्या हत्येनंतर एनआयएच्या (NIA) तपासात मोठा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दोन्ही पीडितांव्यतिरिक्त, असे अनेक लोक आहेत, ज्यांना ‘धडापासून डोके वेगळे करण्याची’ धमकी दिली जात आहे. अशा लोकांना भीतीमध्ये जगणे भाग पडले आहे. यापैकी बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी नकळत सोशल मीडियावर पोस्ट फॉरवर्ड केल्या आहेत किंवा नुपूर शर्माला समर्थन दिले आहे. तेव्हापासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच पार्श्वभुमीवर अशा लोकांसाठी विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) काशी प्रांतातर्फे मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
प्रयागराजमध्ये काल विहिंपचे काशी प्रांताचे प्रदेश संघटन मंत्री गजेंद्र यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी धमक्यांमुळे किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भीतीने जगणाऱ्या हिंदूंना मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ते म्हणाले की, ‘हिंदू समाजावर ठिकठिकाणी हल्ले करणे, मिरवणुकांवर हल्ले करणे, हिंदू देवी-देवतांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करून भीतीचे वातावरण निर्माण करणे अशा गोष्टी इस्लामिक कट्टरतावादामुळे होत आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट आवडली नसल्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘अशा परिस्थितीत कोणत्याही हिंदूला कोणतीही धमकी मिळाल्यास ते तातडीने हेल्पलाइन नंबरवर कॉल करून विहिंपची मदत घेऊ शकतात. विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांना केवळ सुरक्षाच देणार नाहीत तर पोलीस ठाणे आणि न्यायालयापर्यंत कायदेशीर गोष्टींसाठी आवश्यक ती मदतही देतील.’
चर्चेदरम्यान काशी प्रांताचे क्षेत्रीय संघटन मंत्री गजेंद्र म्हणाले की, ‘व्हिडिओ जारी करून देशाच्या पंतप्रधानांना धमकावून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले जात आहे, जे उदारमतवादी विचार आणि धर्मनिरपेक्षतेच्या स्वातंत्र्याला आव्हान आहे. अशा धर्मद्रोही आणि देशद्रोही शक्तींशी लढून आपण जिंकू. धमक्यांना बळी पडलेल्या हिंदूंना विनंती आहे की त्यांनी निर्भयपणे त्यांच्या विरोधात स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती द्यावी आणि त्यांची तक्रार नोंदवावी. त्यांना निर्भयपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.’ (हेही वाचा: दुसऱ्या धर्मातील व्यक्तीची हिंदू देवतेवर श्रद्धा असेल, तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश रोखता येणार नाही - मद्रास हायकोर्ट)
उत्तर प्रदेशातील ज्या पाच क्षेत्रांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले त्यात मेरठ (8218329105), कानपूर (9936855898), काशी (9198942004), गोरक्ष (9511178248) आणि अवध (9473795999) यांचा समावेश आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, दिल्ली, कर्नाटक, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.