Women World Cup 2025, IND vs AUS: महिला विश्वचषक २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Team India) एका रोमांचक सामन्यात पराभव केला. टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी करत ३३० धावा उभारल्या. ही त्यांच्या विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तरीदेखील, ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. या जवळच्या लढतीनंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर निराश झाली आणि पराभवाचे कारण गोलंदाज नव्हे, तर फलंदाज असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे वक्तव्य

हरमनप्रीत म्हणाली, “आपली सुरुवात खूप चांगली होती. त्यामुळे आम्हाला किमान ३० ते ४० धावा अधिक करायला हव्या होत्या. शेवटच्या सहा षटकांमध्ये आपण अपेक्षित गतीने धावा काढू शकलो नाही, आणि त्याचाच फटका बसला. विकेट फलंदाजीसाठी उत्कृष्ट होती, पण शेवटच्या टप्प्यात आम्ही चुकलो.” तसेच, मला वाटते की दोन सलग दोन पराभव आपल्यासाठी फारसा फरक पाडणार नाहीत, त्या सोडवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.

सलामीवीरांची दमदार भागीदारी

स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी टीम इंडियाला विजयी सुरुवात करून दिली. मानधनाने ८०, तर प्रतिकाने ७५ धावा ठोकल्या. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. एका टप्प्यावर भारत ४४ षटकांत ४ बाद २९४ वर होता, मात्र नंतरच्या काळात गडी गमावल्यामुळे संघ ४८.५ षटकांत ३३० धावांतच सर्वबाद झाला.

सदरलँडची घातक गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना निःशब्द केले. तिने ९.५ षटकांत फक्त ४० धावा देत ५ बळी घेतले. दुसरीकडे, कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत १०७ चेंडूंमध्ये १४२ धावांची विजयी खेळी केली. तिच्या या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने ६ चेंडू शिल्लक असताना विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण केला.