Gurmeet Ram Rahim Gets Parole Again: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यास पॅरोल मंजूर; बलात्कार, हत्या प्रकरणात भोगतोय तुरुंगवास
Gurmeet Ram Rahim (PC - Instagram)

Gurmeet Ram Rahim Singh Latest News: बलात्कार प्रकरणात जन्मठेप भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा 21 दिवसांसाठी पॅरोल (Furlough) मंजूर करण्यात आला आहे. त्याला दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. स्वयंघोषीत असलेल्या या धर्मगुरुची रोहतक तुरुंगातून सुटका होणार असून तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील शाह सतनाम आश्रमात राहणार आहे. त्याचे आश्रम आणि भक्त देशभरात आहेत. या भक्तांसाठी त्याला पॅरोल मंजूर होणे विशेष उत्साहाची बाब मानली जात आहे.

पॅरॉल मिळण्याची सहावी वेळ:

गुरमीत राम रहीम सिंग (वय 56) याचे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये लक्षणीय फॉलोअर्स आहेत. त्याचा आजवरचा इतिहास प्रचंड वादग्रस्त राहिला आहे. दरम्यान, याही आधी त्याला विविध कारणांवरुन पॅरोल मंजूर झाला आहे. त्याच्या आजारी आईला भेटण्यासह विविध कारणांसाठी पूर्वीच्या पॅरोलसह, तो तुरुंगातून बाहेर पडण्याची ही सहावी वेळ आहे. त्या्या पॅरोलची वारंवारता पाहता कारागृह प्रशासनास नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे. उल्लेखनीय असे की, या पॅरोलबद्दल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

बलात्कारासोबतच हत्या आणि कट रचण्याचा आरोप:

प्राप्त माहितीनुसार, 20 ऑगस्ट 2023 रोजी संपलेल्या महिनाभराच्या पॅरोलनंतर राम रहीम सिंग रोहतक तुरुंगात परतला. त्याआधी त्याला जानेवारी 2023 मध्ये त्याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. वादग्रस्त धार्मिक नेता (गुरु) असलेल्या गुरमीतला डेरा व्यवस्थापक रणजीत सिंगच्या हत्येचा कट रचल्याबद्दल 2021 मध्ये दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे त्याच्या शिक्षा आणि कायदेशीर अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. सन 2019 मध्ये, त्याला आणि इतर तिघांना 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते.

एक्स पोस्ट

कायदेशीर चौकट:

हरियाणा गुड कंडक्ट प्रिझनर्स (तात्पुरती सुटका) कायदा, 2022 नुसार, दोषी कैद्यांना नियमित पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. तथापि, एकाधिक खून किंवा बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्ती पॅरोलसाठी अपात्र आहेत. गुरमीत राम रहीम सिंगच्या ताज्या पॅरोलने अशा सुटकेची योग्यता आणि त्याची वारंवारता यांवरुन पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. या आधीही त्याला मंजूर झालेले पॅरोल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेकांनी त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.