Gold Rate Today: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; जाणून घ्या आजची किंमत
Image | (Photo credit: archived, edited, representative image)

Gold & Silver Rate Today: देशभरात कोरोनामुळे (Coronavirus)  निर्माण झालेल्या चिंताजन्य परिस्थिती मध्ये व्यवसाय व उद्योगांची परिस्थिती वाईट झाली आहे. व्यापार ठप्प असल्याने अनेक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. अशावेळी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेक जण सोने चांदी बाजाराकडे (Gold- Silver Market) वळत आहेत. ही वाढीव मागणी पाहता सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच झळाळी पाहायला मिळत आहे. आज, मंगळवार, 7  एप्रिल रोजी या सोन्याच्या किमतीने मागील काही दिवसातील सर्व रेकॉर्ड मोडत मोठी उडी घेतली आहे. आज भारतात प्रति 10 ग्राम सोन्याचे (24 कॅरेट) चे दर हे 45 ,724  इतके झाल्याचे समजत आहे. तर चांदीच्या किमतीत सुद्धा 2,212 रुपयांची वाढ होऊन दर प्रति किलो 43,435 इतके झाले आहेत. काही दिवसांपासून सोने चांदीच्या बाजारात सतत चढउतार पाहायला मिळत होता अशामध्ये हे वाढलेले भाव सोने व्यापाऱ्यांसाठी नफ्याची संधी घेऊन आले आहेत.

दुसरीकडे, आज (7 एप्रिल) सकाळी सेन्सेक्स 1300 हून अधिक अंकांनी वधारलेला पहायला मिळाला होता. सकाळी सुरूवातीच्या वेळी म्हणजेच शेअर बाजार उघडताच (9.54 वाजता) 28,902.56 पर्यंत सेन्सेक्सने भरारी घेतली होती. तर निफ्टी देखील 8300 च्या वर पोहचला होता. आज आईसीआईसीआई बैंक, इंडसइंड बैंक, एक्सिस बैंक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बैंक, वेदांता लिमिटेड, एम एंड एम, इंफोसिस, सन फार्मा और एचसीएल टेक यांचे शेअर्स आज तेजीत पहायला मिळाले.

दरम्यान, आजचा दिवस आर्थिक दृष्टीने जरी दिलासा देणारा असला तरी कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंतेचे कारण काही अद्याप दूर झालेले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील अवघ्या 12 तासात भारतात तब्बल 354 कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने आता कोरोना बाधितांचा आकडा हा 4421 वर पोहचला आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसल्याचे समजत आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही 891 कोरोना रुग्णांसह विषाणूचे सर्वात मोठे हॉट स्पॉट ठरत आहे.