दर वाढल्याने सोने विक्री 65 टक्क्यांनी घटली; रिसाइक्लिंग मोठ्या प्रमाणावर वाढले
Gold Recycling | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

आंतरराष्ट्रीय बाजारात (Rate in International Market) दरवाढीमुळे सोने धातूला (Gold Metal) सोमवारी (26 ऑगस्ट 2019) स्थानिक बाजारात (मुंबई, दिल्ली) अधिकच झळाळी प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई बाजारात सोमवारी सोने दर (Gold Rate) जीएसटी (GST) लागू करता प्रति दहा ग्रॅम 40,000 रुपयांपार गेला. सोन्यासोबत चांदी दरानेही उसळी मारली. गेल्या काही महिन्यांमध्ये सोने आणि चांदी दर (Silver Rate) सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र, या दरवाढीचा परिणाम सोने विक्रीवर झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात सोने विक्रीत तब्बल 65 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. तर, सोने रिसाइक्लिंग (Gold Recycling) मध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सूवर्ण आभूषण विक्रेत्यांनी सांगितले की, सोन्याचे दर गगनाला भिडू लागल्याने लोक सोने खरेदीपेक्षा सोने रिसाइक्लिंग करण्यावर भर देत आहेत. ऑल इंडियन जेम्स एंड ज्वेलरी फेडरेशन चेअरमन बछराज बामलवा यांनी सांगितले की, दरवाढीमुळे लोक नव्याने सोने खरेदी करण्यापेक्षा जुन्या सोन्यातच काही फेरबदल करत दागिने घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

ज्वेलर्स फेडरेशन अध्यक्ष राकेश शेट्टी यांनी सांगितले की, सेने रिसाइक्लिंगमध्ये सुमारे 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, त्याऊलट सोने विक्रीत 65 टक्क्यांची घट झाली आहे. शेट्टी यांनी सांगीतले की, सध्यास्थितीतील सोने दर अधिक झाल्यामुळे लोक पहिल्या सोन्यावरच घडणावळ (मेकिंग चार्ज) देऊन आपल्या पसंतीचे दागिने घडविण्यावर भर देऊ लागले आहेत. शेट्टी यांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत सोने दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 41,000 रुपयांवर जाऊ शकतो. (हेही वाचा, Gold Rate: मुंबईच्या इतिहासात सोने दरात विक्रमी वाढ; पार केला प्रति तोळ्यासाठी 40 हजाराचा टप्पा, दिवाळीपर्यंत अजून महागण्याची शक्यता)

स्थानिक वायदा बाजार एमसीएक्स वर सोने दर सोमवारी 39,340 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका राहिला. दरम्यान, त्यानंतर 216 रुपयांच्या तेजीसोबत सोने दर प्रति 10 ग्रॅम 38,981 रुपये इतका राहिला. एमसीएक्सवर चांदीचा दर 429 रुपयांच्या तेजीसोबत 45,031 रुपये प्रति किलो इतका राहिला. तर, चांदी एमसीएक्सवर 45,376 प्रती किलो अशी राहीली.