Glacier Breaks in Uttarakhand (फोटो क्रेडिट्स: ANI)

उत्तराखंडमधील (Uttarakhand) जोशीमठ येथे मोठा अपघात झाला आहे. रविवारी चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात ग्लेशियर (Glacier) फुटल्यामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश म्हणाले की, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून, एनडीआरएफची टीम लवकरच पोहोचेल. या दुर्घटनेत 100 ते 150 लोक वाहून गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा जोशीमठ परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे.

सध्या 200 हून अधिक आयटीबीपी जवान बचाव कार्यात मदत करत आहेत. ग्लेशियर अपघातात सुमारे 10 हजार लोक प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, ‘उत्तराखंडमधील दुर्दैवी परिस्थितीवर मी सतत नजर ठेवून आहे. भारत उत्तराखंडबरोबर आहे आणि राष्ट्र तेथील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. परिस्थितीबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. एनडीआरएफ,, बचाव कार्य आणि मदतकार्याविषयी वेळोवेळी अपडेट्स घेत आहे.’

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘या कठीण काळात मोदी सरकार उत्तराखंडमधील जनतेशी खांदा लावून उभे आहे. एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या संघटना तिथे पोहोचल्या आहेत, हवाई दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे. देवभूमीत होणारी जीवितहानी कमी करणे आणि तिथली परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होवो हे आमचे प्राधान्य आहे.’ (हेही वाचा: उत्तराखंडमध्ये जोशीमठात हिमकडा कोसळल्यानंतर सोनू सूद, दीया मिर्झा, श्रद्धा कपूर आदी कलाकारांनी व्यक्त केलं दु:ख)

या दुर्घटनेनंतर ऋषिकेशमध्ये बांधलेले सर्व घाट रिकामे केले आहेत. प्रशासनाने राफ्टिंगवर बंदी घातली आहे. घाटावरील शिबिरामध्ये लोकांना प्रवेश नाकारला गेला आहे. तपोवन भागात एनटीपीसीच्या ठिकाणी 9 ते 10 मृतदेह सापडले असल्याचे आयटीबीपीने म्हटले आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात झालेल्या हिमस्खलनानंतर, धौलीगंगा नंदीमधील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना वरच्या भागात पाठविले जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार व इतर ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.