सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) साजरा करण्यास जवळजवळ 100 वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रापासून सुरु झालेला हा उत्सव आता जगभरात मराठी व अमराठी लोकही साजरा करतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्ली (Delhi) येथील, ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या (Maharashtra Emporium) दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र एम्पोरियमला सदिच्छा भेट दिली. दिल्लीत 39 गणेश मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. काळानुसार यामध्ये अमराठी भक्तांचाही सहभाग वाढला आहे. अनेक मान्यवरांनी गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. इथे गणेशमूर्तींची विक्री 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमुर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या 28 वर्षांपासून गणेशमुर्ती विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील 22 वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील ‘मऱ्हाठी’ एम्पोरियमध्ये येतात. यावर्षी कोरोना प्रादूर्भाव असुनही मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (हेही वाचा: कोरोना विषाणूमुळे गणेशमूर्तीकारांच्या व्यवसायांवर मोठा परिणाम)
यंदा सर्वच उत्सवावंवर कोरोनाचे सावट आहे, अशात या ठिकाणी पर्यावरणपूरक 100 शाडूच्या मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मुर्त्यांची उंची 6 इंच ते 2 फुट इतकी आहे. तसेच त्यांची किंमत 700 रूपयांपासून ते 25 हजार रूपयांपर्यंत आहे. महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात, गणेशचतुर्थी अर्थात दिनांक 22 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येवू शकतो. दरम्यान, कोरोन विषाणूमुळे यंदा अनेक मोठ मोठ्या मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.