Spain (Photo acredit : Pixabay)

Fully Paid Week-Long Trip To Spain: कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या भेटवस्तू दिल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. चेन्नईच्या (Chennai) एका फर्मने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना आठवडाभराच्या स्पेनच्या सहलीवर पाठवले आहे. या 1000 कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च कंपनी स्वतः उचलणार आहे. चेन्नई रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी कासाग्रँडने (Casagrand) 'प्रॉफिट-शेअर बोनान्झा' अंतर्गत कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. याआधी गेल्या वर्षीही या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या सहलीची भेट दिली होती.

कंपनीच्या यशात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या लोकांची मेहनत आणि समर्पणामुळे हा प्रवास साध्य झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. (हेही वाचा: Reliance Jio Diwali Gift Box: मुकेश अंबानींनी दिवाळीत रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांना दिली 'ही' भेट; अनबॉक्सिंगचा व्हिडिओ व्हायरल)

कंपनीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील विक्री लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांचे समर्पण, वचनबद्धता आणि सहकार्य दर्शविण्यासाठी हा कार्यक्रम आहे.’ कंपनीचा असा विश्वास आहे की, अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे, असे कार्यस्थळ तयार करण्यात मदत होते. विक्रीचे टार्गेट पूर्ण केल्यावर स्पेन सहलीसाठी निवडलेले कर्मचारी कार्यकारी ते वरिष्ठ नेतृत्वापर्यंत विविध भूमिका आणि विभागांमधून आहेत.

या हजार कर्मचाऱ्यांमध्ये भारताव्यतिरिक्त दुबईतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वांना स्पेनच्या सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांव्यतिरिक्त त्यांना बार्सिलोनाच्या शांत समुद्रकिनाऱ्यांवरही नेले जाईल. दरम्यान, 2003 मध्ये कंपनी सुरू झाल्यापासून ते आपल्या कर्मचाऱ्यांना सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, दुबई, मलेशिया आणि लंडन अशा अनेक देशांमध्ये घेऊन गेले आहेत. कोविड महामारीच्या काळातही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इतर देशांमध्ये प्रवास घडवला होता.