सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय आणि लोकांची प्रचंड मागणी पाहता भारतीय रेल्वेने (Indian Railways) नवीन स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. दिवाळी आणि छठ पूजेच्या कालावधीमध्ये लोकांना आपापल्या घरी जाता यावे यासाठी रेल्वेने नागपूर-करमाळी (Nagpur-Karmali), मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) दरम्यान ‘फेस्टीव्ह स्पेशल ट्रेन’ (Festival Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेने म्हटले आहे की, 18 ऑक्टोबरपासून पूर्णपणे आरक्षित तिकिटांचे बुकिंग सुरू केले जात आहे. या स्पेशल ट्रेन असल्याने त्यांचे तिकीट शुल्क देखील स्पेशल असेल.
या विशेष गाड्यांची तिकिटे संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि वेबसाइट www.irctc.co.in वर घेता येतील. मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्यांना भारतीय रेल्वेचे वेब पोर्टल किंवा एनटीईएस अॅपवर सविस्तर माहिती मिळू शकते. प्रवाशांना हवे असल्यास ते 'रेलमदत हेल्पलाईन नंबर' 139 वर देखील संपर्क साधू शकतात. या सण विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्व कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
या स्पेशल गाड्या पुढीलप्रमाणे-
नागपूर-करमाळी साप्ताहिक सुपरफास्ट -
01239 सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 30 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून 15.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
थांबे: ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबेल.
ट्रेनमध्ये एक एसी-2 टायर, चार एसी-3 टायर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग अशी व्यवस्था असेल.
मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन -
01247 सुपरफास्ट विशेष ट्रेन 29 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
01248 सुपरफास्ट स्पेशल 30 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूरहून 17.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: या गाड्या कल्याण, इगतपुरी (फक्त 01248 साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबतील.
यामध्ये एक एसी फर्स्ट क्लास, दोन एसी-2 टायर, पाच एसी-3 टायर, 5 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग कोच असतील. (हेही वाचा: देशाअंतर्गत विमान उड्डाणांसाठी पूर्ण क्षमतेने परवानगी, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)
पुणे-भगत की कोठी साप्ताहिक विशेष ट्रेन -
01249 विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी 20.10 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.55 वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
01250 साप्ताहिक विशेष ट्रेन 23 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान दर शनिवारी भगत की कोठी येथून 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.05 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिल्डी, धनेरा, राणीवाडा, मारवाड भीनमल, मोड्रान, जालोर, मोकलसर, समधारी आणि लुनी.
ट्रेनमध्ये एक एसी-2 टायर, चार एसी-3 टायर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास चेअर कार असे डब्बे असतील.