Dowry (फोटो सौजन्य - Pixabay)

Tamil Nadu Shocker: देशात हुंडा (Dowry) ही प्रथा इतकी हिंसक बनत चालली आहे की, आता तरुणी या त्रासाला कंटाळून थेट मृत्यूला कवटाळत आहेत. महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे 27 वर्षीय नवविवाहित रिधान्याने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या पालकांना अटक (Arrest) केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी रिधान्याने तिच्या वडिलांना सात व्हॉट्सअॅप ऑडिओ संदेश पाठवले होते, ज्यामध्ये तिने तिच्या निर्णयाबद्दल माफी मागितली होती आणि हुंड्यासाठी तिच्या सासरच्यांकडून होणाऱ्या कथित छळाचा उल्लेख केला होता. रिधान्याने तिच्या वडिलांना पाठवलेल्या ऑडिओ संदेशात म्हटले आहे की, 'कविन आणि त्याच्या पालकांनी मला लग्नासाठी अडकवण्याचा कट रचला होता. मी त्यांचा रोजचा मानसिक छळ सहन करू शकत नाही. याबद्दल कोणाशी बोलावे हे मला माहित नाही. काही लोक मला तडजोड करू इच्छितात, ते म्हणतात की जीवन असेच आहे. त्यांना माझे दुःख समजत नाही. कदाचित तुम्हालाही असे वाटेल की मी खोटे बोलत आहे, पण तसे नाही. सगळे जण ढोंग करत आहेत आणि मला माहित नाही की मी का गप्प आहे किंवा मी असा निर्णय का घेत आहे. पण मला आयुष्यभर तुमच्यावर ओझे व्हायचे नाही. यावेळी मी कोणतीही चूक केली नाही. मला हे जीवन आवडत नाही.' (हेही वाचा - HC On Pregnancy Test: बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीत आता गर्भधारणा चाचणी अनिवार्य; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

रिधान्याने पुढे म्हटलं आहे की, 'ते माझा मानसिक छळ करत आहेत. तो (कविन) माझा शारीरिक छळ करत आहे. मी माझे आयुष्य चालू ठेवू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझी आशा आहात, पण मी तुम्हाला खूप दुखावले. तुम्ही उघडपणे सांगू शकत नाहीस. परंतु, तुम्ही मला या अवस्थेत पाहू शकत नाहीस. मी तुमचे दुःख समजू शकते. पण मला माफ करा बाबा, सर्व काही संपले आहे. मी जात आहे.' (हेही वाचा - Mumbai Sathye College Student Dies Of Suicide: विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज मध्ये 21 वर्षीय तरूणीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य; कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय)

कीटकनाशक गोळ्या खाऊन संपवलं जीवन -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिधान्या रविवारी मोंडिपलायममधील एका मंदिरात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. वाटेत तिने कीटकनाशक गोळ्या खाल्ल्या. बराच वेळ एका ठिकाणी उभी असलेली कार पाहून स्थानिकांनी सेयूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडीची तपासणी केली, तेव्हा त्यांना रिधान्या गाडीत मृत आढळली.

आरोपींना अटक

दरम्यान, पोलिसांनी रिधान्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून कविन कुमार, त्याचे वडील ईश्वरमूर्ती आणि आई चित्रादेवी यांना अटक केली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या अन्नादुराईने एप्रिलमध्ये आपल्या मुलीचे लग्न कविन कुमारशी केले होते. अन्नादुराईने लग्नात 800 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 70 लाख रुपये किमतीची व्होल्वो कार हुंडा म्हणून दिली होती.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक -

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891; निमहंस – 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 080-23655557 आयकॉल – 022-25521111आणि 9152987821; पीक माइंड – 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555