Employment In India: भारतीय अर्थव्यवस्थेत 2023-24 मध्ये 4.7 कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अहवालातून ही माहिती समोर आली आहे. देशात काम करणाऱ्यांची संख्या आता 64 कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने सरासरी 2 कोटी रोजगार निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या माहितीमुळे सिटी बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यात म्हटले होते की भारत 7 टक्के विकास दर असतानाही पुरेसा रोजगार निर्माण करू शकणार नाही. यासह आरबीआयने असेही सांगितले की, 2022-23 मध्ये 27 क्षेत्रांमधील रोजगार 3.31 टक्क्यांनी वाढला आहे.
आरबीआयच्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023-24 या आर्थिक वर्षात भारतात 4,66,59,221 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. याद्वारे 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील रोजगार 64.33 कोटींवर पोहोचला आहे. तो 2022-23 मध्ये 59.66 कोटी इतका होता. याचा अर्थ 2023-24 दरम्यान त्यामध्ये सुमारे 6% वाढ झाली आहे. आरबीआयने दिलेली ही आकडेवारी तात्पुरती आहे. आरबीआयच्या केएलइएमएस (KLEMS) डेटा अहवालात ही माहिती समोर आली आहे. 2023-24 व्यतिरिक्त, या अहवालात मागील वर्षांमध्ये निर्माण झालेल्या रोजगाराचा डेटा देखील आहे. अहवालानुसार 2017-18 नंतर भारतात रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे.
अहवालानुसार 2017-18 आणि 2021-22 दरम्यान देशात 8 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजेच या काळात देशात दरवर्षी सरासरी 2 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे, कारण या काळात कोविड महामारीमुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला होता. भारतातील रोजगारासंदर्भातील ही माहिती सिटी बँक ग्रुपच्या अलीकडील अहवालातील दाव्याचे खंडन करते. सिटी बँक ग्रुपने अलीकडेच एका अहवालात दावा केला होता की, भारत येत्या काही वर्षांत आपल्या लोकसंख्येसाठी आवश्यक रोजगार निर्माण करू शकणार नाही. (हेही वाचा: Supreme Court On AIBE Cut-Off: 'वकील व्हायचे असेल तर अभ्यास करा...'; सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूड संतापले)
सिटी बँकेचे म्हणणे आहे की, भारताला दरवर्षी सरासरी 1.2 कोटी नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील जेणेकरून, दरवर्षी तितक्याच नवीन लोकांना रोजगाराच्या बाजारात रोजगार मिळू शकेल. सिटीबँकेचा अंदाज आहे की, जर भारताचा विकास दर 7% दराने झाला तर दरवर्षी केवळ 80-90 लाख रोजगार निर्माण होऊ शकतील. मात्र आता आरबीआयच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की, भारत दरवर्षी सरासरी 2 कोटी रोजगार निर्माण करण्यास सक्षम आहे.