Eknath Shinde | Twitter

राज्याच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी तातडीने आपल्य गटातील आमदार तसेच मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवनात दुपारी 4 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. (हेही वाचा - Maharashtra Politics: बंडखोरांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी फासलं काळं, राष्ट्रवादीच्या कार्यालयात गोंधळ; पहा व्हिडिओ)

बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री तसेच आमदार खासदारांसह सर्व पदाधिकारी दुपारी २ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच आमदारांना जास्त निधी देत होते, मुख्यमंत्रीपद वगळता उद्धव ठाकरे यांच्या हातात सरकारमधील काहीही नव्हतं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्याचबरोबर भाजपसोबत जाऊन आपण हिंदुत्व कायम राखलं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता.

मात्र आता अजित पवार हेच शिंदे - भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि खासदार नाराज असल्याची बातमी आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याआधीच मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातंय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार आपली नाराजी व्यक्त करतात का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.