Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake Hits Delhi-NCR: देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये 4.1 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद आणि इतर लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जरपासून 4 किमी ईशान्येस होते आणि ते 14 किमी खोलीवर होते. भूकंपानंतर लगेचच दिल्लीतील अनेक भागातील रहिवासी पंखे आणि इतर घरातील वस्तू हलू लागल्याने घराबाहेर पडले. नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादमधील कार्यालयीन भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे 28.63 उत्तर अक्षांश आणि 76.68 पूर्व रेखांशावर 10 किलोमीटर खोलीवर होते.

कोणतीही जीवितहानी नाही -

आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे अधिकृत वृत्त नाही. दिल्ली-एनसीआर प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात येतो. येथे सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप अनेकदा होतात. भूगर्भशास्त्रज्ञ या भागात होणाऱ्या भूकंपीय हालचालींवर सतत लक्ष ठेवतात. तज्ञांचे म्हणणे आहे की अशा सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप हळूहळू पृथ्वीमध्ये साठवलेली ऊर्जा सोडतात, जी भविष्यात मोठ्या आणि विनाशकारी भूकंपांचा धोका काही प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकते. (हेही वाचा - Rajasthan Fighter Plane Crash: राजस्थानच्या रतनगढ भागातील भानुदा गावात भारतीय हवाई दलाचं विमान क्रॅश)

आसाममध्ये भूकंपाचे धक्के

मंगळवारी आसाम राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापी, सोमवारी अंदमान समुद्रात १० किलोमीटर खोलीवर 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. रविवारी त्याच भागात त्याच तीव्रतेचा आणि खोलीचा आणखी एक भूकंप नोंदवण्यात आला.