Photo Credit- X

MPSC Exam:  MPSC कडून लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एमपीएससीची ही परिक्षा टीसीएसकडून घेण्यात येत होती. पवई येथे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. एमपीएससी आणि टीसीएस विरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. परिक्षा अचानक रद्द करण्यामागे तांत्रिक बिघाडांचं कारण देण्यात आलं आहे. सध्या नीट परिक्षेमध्ये झालेल्या गोंधळाचे वातावरण थंड होत नाही तोच हा प्रकार घडल्याने स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहे. अनेकांचं भवितव्य टांगणीला लागल्याने आजच परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. (हेही वाचा:NEET UG 2024 Re-Exam Result: NTA कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; exams.nta.ac.in वर पहा स्कोअरकार्ड )

नेमक काय घडलं?

लिपिक टंकलेखक 2023 साठी टीसीएसकडून 1 जुलै ते 13 जुलै कालावधीत कौशल्य चाचणी पवईच्या आयओएन डिजिटल झोन येथे आयोजित केली होती. 1 जुलैला सकाळच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. सकाळी 9 ते 10 असा परीक्षेचा वेळ होता. पण 12 वाजले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा संपवून बाहेर सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा 11.30 ते 12.30 या वेळेत होती. पण त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही त्यामुळे त्यांना पेपर देताच आला नाही.

आज परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी पुढील तारीख लवकर कळवण्यात येईल असे टीसीएसने सांगितले. पण विद्यार्थी आजच परिक्षा देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून परीक्षा आजच झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. परीक्षा रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी टीसीएसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.