उद्या 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. हा अमृत महोत्सवी टप्पा गाठताना सर्व भारतीयांचा उर नक्कीच भरुन आला आहे. दरम्यान, 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असल्यामुळे इतर राष्ट्रीय सणांप्रमाणेच या दिवशी देखील संपूर्ण देशभरात ड्राय डे (Dry Day) असणार आहे. सर्व पब्स, बार्स यामध्ये दारु सर्व्ह केली जाणार नाही. यासोबतच सर्व दारुची दुकानेही (Liquor Shops) बंद असणार आहेत. भारतातील Alcohol Laws नुसार, 15 ऑगस्ट रोजी दारुच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे.
भारत हा विविध जाती, संस्कृती आणि व्यवसायांनी भरलेला देश आहे. सर्व भारतीयांच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासाठी 15 ऑगस्ट हा एक खास दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हजारो स्वातंत्र्यवीरांची आठवण काढण्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी देशभरात ड्राय डे घोषित केला जातो.
स्वातंत्र्य दिन देशातील अगदी लहानसहान गावांतही अगदी उत्साहाने साजरा केला जातो. यासोबतच सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दारुची अजिबात आवश्यकता नाही. (List of Dry Days 2021 in India: या दिवशी तुम्हाला देशात कुठेच दारु मिळणार नाही; पाहा तारखेसह संपूर्ण यादी)
ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या जुलमातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. या दिवशी मुक्त आणि स्वतंत्र भारताचा जन्म झाल्याने हा दिवस संपूर्ण भारतवासियांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि खास आहे. तेव्हापासून स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. यापुढेही ही परंपरा कायम राहील.