Suicide | Representational Image | (Photo Credits: PTI)

प्रेमभंगामुळे आलेल्या नैराश्येतून एका तरुणाने चक्क ग्राइंडरने आपला गळा चिरत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करुन तरुणाने हे कृत्य केले. सदर घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील महाराजगंज (Maharajganj ) जिल्ह्यात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेचा त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृताचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भगवानपूर भागात ही घटना घडली. येथे राहणाऱ्या तरुणाने प्रेयसीवर धोका दिल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह करत ग्राइंडरने स्वत: गळा चिरून आत्महत्या केली. लाईव्ह दरम्यान तरुणाने प्रेयसीच्या कुटुंबीयांना अनेक गोष्टी सांगितल्या. फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या अनेकांनी त्याला हे कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचेच ऐकले नाही. (हेही वाचा, Crime: उत्तर प्रदेशात लग्नास नकार दिल्याच्या कारणांवरून 14 वर्षीय मुलीची हत्या, आरोपी अटकेत)

सांगितले जात आहे की, आत्महत्या केलेल्या तरुणाचे त्याच्या गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र तरुणाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे लावले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने फेसबुकवर प्रेयसीचे व कुटुंबीयांचे नाव घेत आपला गळा कापला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तरुणाच्या सुसाईड नोटमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.