दिल्लीतील हिंसाचारामुळे गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, 'या' ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा राहणार बंद
Delhi Protest (Photo Credits-ANI)

दिल्लीत (Delhi) आंदोलक शेतकऱ्यांच्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील परिस्थिती पाहचा दिल्ली आणि सीमेच्या परिसरात सीआरपीएफच्या 15 कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक जवळजवळ दोन तास चालली. या बैठकीदरम्यान, आयबी निर्देशक आणि गृह सचिव यांच्यासह अधिकारी यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली. बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, संवेदनशील ठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. सुत्रांनुसार गुप्तचर यंत्रणांना अद्याप हिंसा होऊ शकतो अशी शंका आहे.(Farmers Tractor Rally: मेट्रोलाईन बंद, लाठीचार्ज, अश्रुधूर, शेतकरी-दिल्ली पोलीस झटापट; शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना)

याआधील केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पाच परिसरात इंटरनेट बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिंसाचारामुळे दिल्लीतील सिंघु बॉर्डर, गाझिपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोई परिसरात आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.(दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल)

तसेच दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने सुद्धा येथे झालेल्या हिंसेची निंदा केली असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने हिंसाचार होईपर्यंत परिस्थिती बिघडवली असल्याचे ही आम आदमी पक्षाकडून बोलले गेले आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे नेते शिवकुमार कक्का यांनी असे म्हटले की, दिल्लीत तोडफोड करण्यात आली आहे. तर संयुक्त किसान मोर्चाने सु्द्धा असे म्हटले की, काही असमाजिक तत्वांनी आंदोलनाला हिंसक वळण लावले. काही संघटना आणि काही लोकांनी आज नियमांचे उल्लंघन केले आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे.