Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी पोलिसांकडून हिरवा कंदील
Tractor Parade Representative Image (Photo Credits: PTI)

यंदा प्रजासत्ताक दिना (Republic Day 2021) दिवशी एक खास गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे यंदा दिल्लीत राजपथावर भारतीय सैन्याची परेड (Parade) पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर (Delhi Border) आपल्या अन्नदात्याची म्हणजेच शेतक-यांची ट्रॅक्टर परेड (Tractor Parade) पाहायला मिळणार आहे. या परेडकरिता पोलिसांकडून परवानगी मिळावी अशी शेतक-यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. त्यास अखेर आज परवानगी देण्यात आली आहे. PTI नुसार, यंदा दिल्लीच्या सीमेवर ही ट्रॅक्टर परेड पाहायला मिळणार आहे. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत.

शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.

हेदेखील वाचा- Tableau of Maharashtra 2021: प्रजासत्ताक दिनी यंदा संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची इथे पहा झलक (Watch Video)

दरम्यान या ट्रॅक्टरला परेड पोलिसांनी जरी परवानगी दिली असली तरी अनेक अटी आणि नियमांचे पालन शेतक-यांना करावे लागणार आहे. तसेच शेतकरी नेत्यांनी देखील या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करु असे सांगितले आहे.

शेतकरी दिल्लीत येतील आणि शांततेत मोर्चा काढतील, असं शेतकरी नेते म्हणाले. उद्या परेडचा मार्ग अंतिम होईल. शनिवारी शेतकरी नेते व पोलिस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव म्हणाले की, 26 जानेवारी रोजी शेतकरी या देशात प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड करणार आहे. पाच टप्प्यांच्या चर्चेनंतर या सर्व गोष्टींना मंजुरी देण्यात आली आहे. सर्व बॅरिकेड्स उघडतील, दिल्लीत जाऊन आम्ही परेड काढणार आहे. रुट कोणता असेल याबाबत जवळपास सहमती झाली आहे.

परेडची वेळ अद्याप अंतिम नाही. या परेडची वेळ निश्चित झाली नाही मात्र, परेड 24 तास ते 72 तास चालू शकते असा शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.