मुंबईमधून BJP खासदार Keshari Devi Patel यांना जीवे मारण्याची धमकी; 50 लाखांची खंडणीही मागितली
Keshari Devi Patel (संग्रहित संपादित प्रतिमा)

फुलपूरच्या भाजप खासदार केशरी देवी पटेल यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यापूर्वी फोन आणि पत्राद्वारे त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. केशरी देवी पटेल यांनी आता कर्नलगंज पोलीस ठाण्यात अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतून या धमक्या आल्याचे प्राथमिक निरिक्षणातून समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की पोलिसांचे पथक आता धमक्यांमागील व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

एफआयआरनुसार, केशरी देवी पटेल यांच्या मोबाईलवर 1 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. त्यावेळी फोन रिसिव्ह होऊ शकला नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी त्यांना त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता समोरच्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली. फोन करणाऱ्याने 50 लाख रुपये देण्यास सांगितले आणि पैसे न दिल्यास खासदार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

(हेही वाचा: दिल्लीस्थित क्रिकेटपटूकडून हनी ट्रॅपिंग, ब्लॅकमेलिंग आणि पैसे उकळल्याप्रकरणी तिघांना अटक)

कॉलरने त्यानंतरही अनेकवेळा कॉल केले आणि वारंवार धमक्या दिल्या तसेच खंडणीची मागणी केली. यावेळी खासदारांचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. महिनाभरापूर्वी 50 लाख रुपयांची मागणी करण्याची धमकी देणारे पत्र आले होते, मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही, असेही खासदारांनी पोलिसांना सांगितले. कर्नलगंज पोलीस ठाण्याचे एसएचओ राम मोहन राय यांनी एफआयआरला दुजोरा देताना सांगितले की, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.