DMart supermarket (Photo credits: Facebook/DMart)

सुपरमार्केट चेन डी-मार्ट (D-Mart) म्हणून ओळखल्या जाणार्‍या एव्हीन्यू सुपरमार्ट या कंपनीचे बाजार भांडवल सोमवारी 1.50 लाख कोटी रुपयांवर पोहचले. या कंपनीने नेस्ले आणि बजाज फिनसर्व्ह या दिग्गजांना पराभूत केले आहे. अशाप्रकारे ही कंपनी आता देशातील 18 वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. केवळ अडीच वर्षांत डी-मार्टच्या समभागाने तब्बल 290% परतावा दिला आणि देशातील आठव्या क्रमांकाची कंपनी ठरली.

कंपनी 21 मार्च 2017 रोजी शेअर बाजारात रजिस्टर झाली होती आणि त्यावेळी त्यांची एम कॅप 39,988 कोटी रुपये होती. तेव्हापासून त्याच्या शेअरची वाढ 290% झाली आहे.

5 फेब्रुवारी रोजी कंपनीने संस्थात्मक गुंतवणूकदारांना आपले शेअर्स विक्रीची घोषणा केली होती, त्यानंतर सोमवारी शेअर्स 8.6 टक्क्यांनी वाढून 2,484.15 रुपयांवर पोहचला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. शेअर्समुळे कंपनीचे संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) 43,300 कोटी (11.9 अब्ज डॉलर्स) च्या मालमत्तेसह भारतातील सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मालमत्तेच्या बाबतीत गौतम अदानी (75,600 कोटी) आणि एअरटेलचे सुनील मित्तल ( 67,200 कोटी) यांना दमानी यांनी मागे टाकले आहे.

सध्या कंपनीचे विप्रो, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सपेक्षा जास्त बाजार भांडवल आहे. राधाकिशन दमानी यांनी 1980 च्या दशकात शेअर बाजारात पदार्पण केले. 2017 मध्ये त्यांची कंपनी डी-मार्टनेचा आयपीओ केला. 20 मार्च 2017 पर्यंत, राधाकिशन दमानी केवळ एका किरकोळ कंपनीचे मालक होते, परंतु 21 मार्च रोजी सकाळी मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये त्यांची संपत्ती 100 टक्क्यांनी वाढली. (हेही वाचा: चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीने घेतली निवृती; 'अलिबाबा'चे संस्थापक Jack Ma वाढदिवसादिवशी अध्यक्षपदावरून पायउतार)

21 मार्च, 2017 रोजी सकाळी, जेव्हा राधाकिशन दमानी यांच्या कंपनीचा आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला, तेव्हा त्यांची संपत्ती अनेक श्रीमंत कुटुंबांपेक्षा जास्त होती. डी-मार्टचा साठा 604.40 रुपये होता तर इश्यूची किंमत 299 रुपये ठेवली गेली. हा 100 % परतावा आहे.