जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा (Alibaba) ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांनी कंपनीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे वेगाने बदलणार्या उद्योग क्षेत्रातील अनिश्चिततेचा काळ सुरु आहे. अशा परिस्थितीत जॅक मा यांचा राजीनामा चर्चेचा विषय बनला आहे. आज मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी आपल्या 55 व्या वाढदिवसादिवशी जॅक मा यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांचा अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. आज त्यांनी आपला पदत्याग केला.
पदावरून पायउतार झाल्यानंतरही ते अलीबाबा पार्टनरशिपचे सदस्य राहतील. हा निर्णय ज्या लोकांनी घेतला तो, 36 लोकांचा समूह आहे ज्यांना कंपनीच्या संचालक मंडळावर बहुसंख्य सदस्य नामित करण्याचा अधिकार आहे. जॅक मा (55) यांनी 1999 मध्ये अलिबाबाची स्थापना केली होती. चिनी निर्यातदारांना थेट अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांशी जोडण्यासाठी त्यांनी अलिबाबा ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली होती. पुढे चीनच्या वाढत्या ग्राहक बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी कंपनीने कामाची व्याप्ती वाढवली. जॅक मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण 16.7 अब्ज व्यवसायात देशातील व्यवसायाचा 66 टक्के हिस्सा होता. चीनच्या हाँगझोऊ येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स स्टेडियममध्ये 80,000 लोकांच्या समोर जॅक यांनी निवृत्तीची घोषणा केली. डॅनियल झांग आता कंपनीची धुरा सांभाळणार आहेत. अलिबाबा ग्रुप ही 460 अब्ज डॉलर्सची कंपनी आहे. सेवानिवृत्तीनंतर केवळ शैक्षणिक कामेच करणार नाहीत तर, त्यांची 41 अब्ज डॉलर्सची संपत्ती शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणूनही देणार आहेत. चीनशिवाय अलिबाबाची भारतासह जगभरातील अनेक ठिकाणी कार्यालये आहेत. भारतात ही कंपनी यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूजच्या नावाने अधिक ओळखली जाते.