Covishield लस घेऊन तयार झाल्या नाहीत अँटीबॉडीज; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ Adar Poonawalla यांच्यासह 7 जणांना न्यायालयाने बजावले समन्स
Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

कोविशील्ड (Covishield) लस घेऊनही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत तसेच प्लेटलेट्सदेखील कमी झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) आणि इतर सात जणांविरुद्ध दाखल केलेल्या फेरविचार अर्जावर न्यायालयात 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी पूनावाला यांच्यासह केंद्रीय औषध मानक नियंत्रण महासंचालक, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, आयसीएमआरचे महासंचालक, संयुक्त सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, उत्तर प्रदेशचे संचालक आणि गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, लखनौचे संचालक यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

जून महिन्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविशिल्ड लस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत, त्यामुळे कोर्टाने सीरम इन्स्टिट्यूटच्या सीईओसह सात जणांना समन्स बजावले आहे. लखनौ जिल्हा न्यायालयाने आदर पूनावाला यांच्यासह सात जणांना 1 एप्रिलला समन्स बजावले आहे. 12 जून रोजी लखनौचे रहिवासी प्रताप चंद्र यांनी लखनऊच्या जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करत, कोरोनाची लस घेऊनही अँटीबॉडीज तयार न झाल्याबद्दल फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी सीरम कंपनीचे मालक आदर पूनावाला, औषध नियंत्रण संचालक, आरोग्य सचिव, आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपीलच्या सुनावणीत युक्तिवाद ऐकून लखनौ जिल्हा न्यायालयाने सर्व 7 आरोपींना 1 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेली कोविशील्ड लस, सरकारी संस्था ICMR, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे मान्यताप्राप्त आणि उपलब्ध करून दिली गेली. विविध सरकारी जाहिरातींद्वारे प्रेरित झाल्याने पहिला डोस 8 एप्रिल 2021 रोजी घेतला गेला. दुसऱ्या डोसची नियोजित तारीख 28 दिवसांनी दिली होती. पण 28 दिवसांनंतर आता दुसरा डोस 6 आठवड्यांनी दिला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सरकारने जाहीर केले की आता दुसरा डोस 6 नव्हे तर 12 आठवड्यांनी दिला जाईल. (हेही वाचा: India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचे आणखी 5921 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 289 जणांचा बळी)

त्यानंतर सरकारने सांगितले की, कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही उत्तम अँटीबॉडीज तयार होतात. चंद्र पुढे म्हणतात, लस दिल्यानंतर आपली प्रकृती ठीक नव्हती. 25 मे 2021 रोजी अँटीबॉडी चाचणी करण्यात आली, त्यामध्ये लस दिल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्याचे दिसले. उलट, सामान्य प्लेटलेट्स देखील निम्म्याने कमी झाल्या होत्या. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला, ज्यामुळे कधीही मृत्यू होऊ शकतो. ही पूर्णतः फसवणूक आहे. हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे.