COVID-19 Vaccination in India: देशात उद्यापासून सुरु होणार कोविड-19 लसीकरण; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या मोहिमेबाबत काही महत्त्वाच्या बाबी
Covid-19 Vaccination | Representational image (Photo credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) संकटामुळे ग्रासलेले देशवासिय लसीच्या आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण जवळ आला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशातील लसीकरण मोहिमेचा (Vaccination Drive) शुभारंभ होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिमे असेल, असे आरोग्यमंत्री म्हणाले होते. यासाठी देशातील तब्बल 3006 केंद्र सज्ज झाली आहेत. काही दिवसांपूर्वी देशातील राज्यांमध्ये लसीचे वितरण करण्यात आले आणि उद्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. या प्रसंगी पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर कोविड-19 लसीचा डोस घेतलेल्या लाभार्थींशी देखील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करणार आहेत. दरम्यान, लसीकरण मोहिमेबद्दलच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर एक नजर टाकूया... (Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?)

# कोविड-19 लस ही देशातील 3006 केंद्रांवर तब्बल 3 लाख फ्रंटलाईन हेल्थकेअर वर्कर्सला दिली जाणार आहे.

# लसीकरण मोहिमेसाठी सरकारने CoWIN अॅप लॉन्च केला आहे याद्वारे कोरोना लसीची डिलिव्हरी, वितरण यावर लक्ष ठेवता येणार आहे.

# सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोविड-19 लस ही केवळ 18 वर्ष आणि त्यावरील व्यक्तींचा देण्यात येणार आहे.

# गरोदर आणि स्तनदा मातांना ही लस देण्यात येणारन नाही.

# ज्या लसीचा पहिला डोस घ्याल त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.

# कोविड-19 लस आणि Co-WIN अॅप संदर्भात काही प्रश्न असल्यास तुम्ही 1075 या हॉटलाईन क्रमांकावर विचारु शकता. ही सुविधा 24x7 उपलब्ध आहे.

उद्यापासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु होत असून यात केवळ आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, आरोग्यसेवक, कोरोना योद्धे यांना ही लस मोफत मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले होते.