आजपासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना व्हायरस संकटामुळे ग्रासलेला देश लसीच्या प्रतिक्षेत होता. अखेर तो क्षण आला आहे. वैज्ञानिक, संशोधक, प्रशासन यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज कोविड-19 वरील लसीच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करतील.
लसीकरण मोहिमेसाठी देशात तब्बल 3006 केंद्र सज्ज असून प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील देशातील 1 कोटी आरोग्य सेवकांना आणि 2 कोटी कोरोना योद्धांना कोविड-19 लस देण्यात येणार आहे. तर जुलैपर्यंत उर्वरीत 27 कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, लसीच्या ड्राय रन्स पार पडल्या असून सर्व राज्यांना लसीचे वितरणही करण्यात आले आहे.
सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोविड-19 लस ही केवळ 18 वर्ष आणि त्यावरील व्यक्तींचा देण्यात येणार आहे. तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना ही लस देता येणार नाही. विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेसाठी सरकारने CoWIN अॅप लॉन्च केला आहे. दरम्यान, कोविड-19 लस आणि Co-WIN अॅप संदर्भात काही प्रश्न असल्यास तुम्ही 1075 या हॉटलाईन क्रमांकावर विचारु शकता. ही सुविधा 24x7 उपलब्ध आहे. (महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण प्रारंभ, 285 केंद्रांवर यंत्रणा सज्ज)
राज्यातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला कोरोना आरोग्य केंद्रात होणार आहे. त्यानंतर दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत लसी दिल्या जातील, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात लसीकरण मोहिमेसाठी 285 केंद्र सज्ज असून 28,500 कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लस मिळणार आहे.