COVID-19 News: सावधान! मुंबईत 10 दिवसांमध्ये 35% तर, देशभरात कालपेक्षा 26.6% वाढले कोरोना व्हायरस संक्रमित
coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निर्बंधांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शिथिलता आणल्याने कोरोना हद्दपार झाला असे तुम्ही मानत असला तर थांबा. तुमच्यासाठी सावधानतेचा इशारा आहे. राज्यातील खास करुन मुंबईतील (Mumbai) कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येत पुन्हा एकदा काहीशी वाढ होताना पाहायला मिळत आहे. याशिवाय कालच्या तुनलेत देशातील कोरोना संक्रमितांची संख्याही पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळते आहे. पाठीमागील 10 दिवसांमध्ये मुंबईतील कोरोना संक्रमितांच्या संख्येत 35% वाढ झाली आहे. दशातही कालच्या तुलनेत 26.6% ची वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत मंगळवारी 122 नव्या रुग्णांची वाढ झाली. रुग्णांमध्ये लक्षणे अगदीच सौम्य स्वरुपाची आहेत. त्यातील दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासांमध्ये एकाही कोरोना रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला नाही. तर 100 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा, COVID 19 In Maharashtra: गर्दीच्या ठिकाणी पुन्हा 'मास्कसक्ती' होण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घेणार निर्णय)

देशभरात पाठीमागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 2,897 संक्रमित पुढे आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत 26.6% नी अधिक आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19,494 इतकी आहे. देशव्यापी लसीकरण अभियानानंतर कोरोना संक्रमितांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 190.67 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 4,25,66,935 इतकी आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला आश्वसीत केले आहे की, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. परंतू ती संख्या अगदीच अल्प आहे. जर काही संख्या वाढली तर आवश्यकतेनुसार उपाययोजना केली जाईल. नागरिकांनी उगाच घाबरुन जाऊ नये. राज्य सरकार कोरोना संक्रमनावर बारीक लक्ष ठेऊन आहे. एकदम मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढीचे कोणतेही चिन्ह सध्यातरी दिसत नाही.