COVID-19 in India: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढील 125 दिवस महत्त्वाचे; केंद्र सरकारचा इशारा
Coronavirus (Photo Credits: Twitter)

देशातील कोरोना रुग्णसंख्येत होणारी घट पाहता नागरिक काहीसे निर्धास्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी होणारी गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र कोविड-19 (Covid-19) संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे धोका अधिक वाढू शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील 125 दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसंच सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे. (कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेल्यांनाही Delta Variant चा संसर्ग- ICMR)

कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतासाठी पुढील 100-125 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशातील नागरिक अद्यापही असुरक्षित आहेत. आपण अजूनपर्यंत हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहचलेलो नाही. लसीकरण सातत्याने वाढत असले तरी अद्याप आपण सर्वजण सुरक्षित नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी ही परिस्थिती कायम ठेवणे गरजेचे आहे आणि कोरोना नियमांचे पालन केल्याने ते शक्य होईल, असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना संकट अद्याप कायम आहे. काही जिल्हे, राज्य आणि भागांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. नियंत्रणात असलेली परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी घेणे आपल्याचा हातात असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉक प्रक्रीया सुरु करण्यात आली. मात्र निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांचा हलगर्जीपणा वाढला आहे. मात्र कोरोना व्हायरसची तिसरी लाट टाळण्यासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग, हातांची स्वच्छता, लसीकरण यांसारख्या कोरोना नियमांच्या पालनाने तिसऱ्या लाटेची गंभीरता कमी होऊ शकते. अन्यथा धोका वाढू शकतो.