Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेदरम्यान, तिसऱ्या लाटेबद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले. साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट (Covid-19  3rd Wave) येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. त्यादृष्टीने अनेक राज्यांनी कोरोनाशी दोन हात करण्याची तयारीही सुरु केली होती. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या कोरोनाच्या आणखी एका लाटेचे चिन्ह दिसत नाही. याआधी काही विषाणूशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी सांगितले होते की तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते.

आता विषाणूशास्त्रज्ञ आणि डॉक्टर म्हणतात की, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, जीनोम सिक्वन्सिंग आणि इतर अभ्यासांमध्ये विषाणूच्या उत्परिवर्तनाची किंवा व्हायरसची नवीन रूपे दिसली नाहीत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. मात्र सरकार आणि तज्ञ दोघांनी नागरिकांना पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत कोविड नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळीपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लस मिळाली असेल.

SARS-CoV-2 च्या जीनोम सिक्वेंसींगचे नोडल अधिकारी डॉ व्ही रवी म्हणतात की अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाचे संक्रमण डेल्टा प्रकारांमध्ये मर्यादित आहे आणि ते कमी होत आहेत. तसेच जस जसे लोकांना लस देण्याचे प्रमाण वाढत आहे तस तसे विषाणू कमकुवत होत आहे. तसेच त्याचे उत्परिवर्तन होण्याची किंवा आणखी काही नवी रूपे समोर येण्याची शक्यताही कमी आहे. (हेही वाचा: कोरोनाचे संकट अजून संपले नाही, कोविड टास्क फोर्सच्या डॉ. व्ही.के.पॉल यांचे वक्तव्य, लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही दिली 'अशी' प्रतिक्रिया)

डॉ व्ही रवी यांनी पुढे सांगितले की, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका पर्यंत मर्यादित असलेले Mu आणि C.1.2 सारखे नवीन प्रकार भारतात येण्याची शक्यता नाही. तसेच नवीन व्हेरियंट आले तरी ते डेल्टा आणि डेल्टा प्लससारखे घातक ठरणार नाही. डेल्टा हा प्रकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस कारणीभूत होता. आरोग्य आयुक्त रणदीप डी म्हणतात की, आपल्याला अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपण 100% दुसऱ्या डोस लसीचे संरक्षण प्राप्त करेपर्यंत कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.