Coronavirus Updates: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह, आज मिळणार डिस्चार्ज
Satyendar Jain (Photo Credits: ANI)

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन (Satyendar Jain ) यांची कोरोना (Coronavirus) चाचणी नेगेटिव्ह आली आहे. जैन यांच्यावर मागील काही दिवसांपासून कोविड-19 साठी उपचार सुरु होते आणि त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर 22 जून रोजी त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. ANI च्या वृत्तानुसार जैन यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करवण्यात आली होती जी नेगेटिव्ह आली. केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता, त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय, दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यताही राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. (Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत 17,296 रुग्णांची सर्वात मोठी वाढ तर 407 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4,90,401 वर)

16 जून रोजी जैन यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 17 जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली. तथापि, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांची तब्येत आणखी खालावली आणि 19 जून रोजी दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. मॅक्स हॉस्पिटलमध्ये 55 वर्षीय जैन यांना प्लाझ्मा थेरपी दिली गेली, ज्यानंतर त्यांची तब्येत सुधारली आणि तापही उतरला. आता ते बरे झाले आहेत आणि आज, शुक्रवारीच त्यांना मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.

दुसरीकडे, भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 4,90,401 झाली आहे, त्यापैकी 1,89,463 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत देशभरात 2,85,637 लोक बरे झाले आहेत आणि 15,301 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 17,296 नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून 407 लोकांचा मृत्यू झाला आहे.