Coronavirus Symptoms in Sambit Patra: भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये आढळली कोरोना व्हायरसची लक्षणे; रुग्णालयात दाखल
संबित पात्रा (Photo Credit-ANI)

संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत असताना, आता या विषाणूचा धोका राजकारण, चित्रपट तसेच इतर अनेक क्षेत्रांमधील महत्वाच्या लोकांना जाणवू लागला आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) चे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली आहेत. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पात्रा यांना मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital Gurugram) दाखल केले आहे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असण्याव्यतिरिक्त, पात्रा हे एक सर्जन आहेत. त्यांनी हिंदूराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

ओएनजीसीच्या मंडळावर पात्रा हे नॉन ऑफिशियल डायरेक्टर्स पैकी एक आहेत. मूळचे ओडिशाचे रहिवासी असलेल्या पात्रा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. मात्र ते बिजू जनता दलाचे उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून 11,700 मतांनी पराभूत झाले. संबित पात्रा हा न्यूज चॅनेल्सवर दिसणारा भाजपाचा लोकप्रिय चेहरा आहे. ते सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहेत.

संबित पात्रा यांच्यामध्ये कोविड-19 ची पुष्टी झाल्यास, पात्रा हे या विषाणूचा संसर्ग होणारे राष्ट्रीय पक्षाचे दुसरे मुख्य प्रवक्ते असतील. गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय झा कोरोना विषाणूला बळी पडले आहे. सध्या ते सेल्फ क्वारेन्टाईनमध्ये आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. चव्हाण हे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये पीडब्ल्यूडी मंत्री आहेत. (हेही वाचा: लॉक डाऊनमुळे भारतात स्वातंत्र्यानंतरची चौथी सर्वात मोठी आर्थिक मंदी; चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 5 टक्के घट- CRISIL)

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 1,58,333 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 86110 सक्रिय प्रकरणे आहेत. देशात 24 तासांत कोरोनाची 6,566 नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि 194 लोकांचा मृत्यू झाला आहे.