Representational Image (Photo Credits: PTI)

चीन मधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आता जगभरात थैमान घातले आहे. भारतातील काही राज्यांमध्ये देखील कोरोना व्हायरस दाखल झाला असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे एकूण 29 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष माहिती दिली आहे. त्यानुसार देशवासीय मास्क (Masks) आणि हँड सॅनिटायझरची (Hand Sanitisers) खरेदी करत आहेत. मात्र मास्क आणि हँड सॅनिटायझरची वाढती मागणी पाहता काही कंपन्यांनी त्यांच्या किंमतीत वाढ केली. (कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केल्या शाळांसाठी महत्वाच्या सूचना)

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, गाजियाबाद येथे मास्क आणि हँड सॅनिटायझर बाजारात उपलब्ध नाहीत. मेडिकल स्टोर मालिक शुभम यांनी सांगितले की, आम्ही मास्क आणि सॅनिटायझरची ऑर्डर दिली आहे. मात्र ते मिळणे कठीण आहे. तसंच जे मास्क आम्ही काही दिवसांपूर्वी 50-60 रुपयांना खरेदी करत होतो त्याची किंमत आता 100-150 रुपये इतकी झाली आहे. तसंच ब्लॅकमध्येही याची विक्री होत आहे.

ANI Tweet:

भारतात प्रथम केरळमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दिल्ली सह इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणं टाळणं, गर्दीत जाणं टाळायला हवं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी यंदा होळी सेलिब्रेट करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.