Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आज सलग दुसर्‍या दिवशी 24 तासांमध्ये 90 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण समोर आल्याने देशात पुन्हा कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज मागील 24 तासांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक दिवसभरातील कोरोना रूग्ण संख्या समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 90,802 नवे रूग्ण समोर आले असून 1016 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 42 लाखांच्या पार गेला आहे. देशात एकूण 42,04,614 जणांना आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये 8,82,542जणांवर देशभर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 71,642 आहे.

ANI Tweet

भारतामध्ये अद्याप कोरोना व्हायरसवर लस किंवा ठोस उपचार नाहीत. अशावेळी वेळोवेळी हात धुणं, मास्कचा योग्य वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत कोरोनापासून स्वतःचा बचाव करा असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान देशात 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊनची नियमावली लागू करण्यात आली आहे. परंतू अनेक व्यवहारांमध्ये सूट देण्यात आली आहे. वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे आता रूग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. नुकताच गणेशोत्सव साजरा झाल्याने अनेक राज्यांत कोरोना व्हायरस पुन्हा वेगाने पसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे.