Coronavirus in India: भारतामधील कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येने पार केला 10 लाखाचा टप्पा, देशात आतापर्यंत 25,605 रुग्णांचा मृत्यू- Worldometers
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मार्च 2020 मध्ये भारता (India) मध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) जोर धरायला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या लॉक डाऊनमुळे देशात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येमध्ये काही प्रमाणत घट झाली. मात्र आज भारताने कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या बाबतीत 10 लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे. Worldometers नुसार, आज संध्याकाळपर्यंत भारतामध्ये कोरोनाचे 1,004,383 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 25,605 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 6,36,541 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना प्रकरणात भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या बाबतीत भारत सध्या आठव्या क्रमांकावर आहे, परंतु आठवड्यात किंवा दहा दिवसांत तो सहाव्या क्रमांकावर येईल.

सध्या जगामध्ये अमेरिकेत सर्वाधिक, 3,649,049 कोरोनाचे रुग्ण आहेत व तिथे 1,40,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांनतर 1,978,236 रुग्ण संख्येसह ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून, तिथे 75,697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत, रशिया व पेरू या देशांचा नंबर लागतो. सध्या या यादीमध्ये पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर असून, पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 2,57,914 रुग्ण आढळले आहेत. सध्या जगामध्ये एकूण 1,38,10,247 कोरोनाचे रुग्ण असून, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण पहिल्या चार देशांमध्ये आहेत. (हेही वाचा: मुंबईत आज 1498 नवे कोरोना रुग्ण, तर 56 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 97,751 वर पोहचली)

जुलै महिन्यात भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली. गेल्या आठवड्यात, देशात दररोज सुमारे 500-600 मृत्यू होत आहेत. 6-7 दिवसांत भारत मृत्यूच्या बाबतीत स्पेनला मागे टाकेल. त्याचप्रमाणे तो 9-10 दिवसांत फ्रान्सला मागे टाकेल. सध्या स्पेन आणि फ्रान्समधील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे. भारतामधील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी, देशाचा रिकव्हरी रेटदेखील वाढला आहे. दरम्यान, भारतमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या 24 तासात आणखी 8,641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे. यासह महाराष्ट्रामधील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 284281 अशी झाली आहे.