
Coronavirus Outbreak: बिहार मध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच आता तेथील आरोग्य विभागाने महाराष्ट्र आणि पंजाब येथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला एक्सप्रेस पासून याची सुरुवात होणार असून जी आज रात्री पर्यंत पोहचणार आहे. खरंतर आकडेवारीनुसार दुसऱ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांच्या कारणामुळे बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरत चालला आहे. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.(Remdesivir इंजक्शनचा भारतभर तुटवडा; औषध दुकानांबाहेर देशभर रांगाच रांगा)
महाराष्ट्रातील कुर्ला येथून गुरुवारी पहिली ट्रेन रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी पटना येथे पोहचणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या तपासासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक ट्रेनमधील प्रवासी जो पटना आणि नजीकच्या रेल्वे स्थानकात उतरतील त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पटना मधील चार रेल्वे स्थानकात कोरोनाची चाचणी करण्याची व्यवस्था केली आहे. डीएम चंद्रशेखर सिंह सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मीडियाशी बोलताना असे म्हटले की, हॉटेल पाटलिपूत्र अशोका मध्ये 165, सगुना मोड येथील राधा स्वामी मध्ये 50 बेड्स आणि सर्व अनुमंडळ रुग्णालयात 50-50 बेड्स, कंगन घाट येथील टूरिस्ट सेंटरमध्ये 100 बेड्स आणि सर्व अनुमंडळ मुख्यालयात 100-100 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रुग्णांच्या भरतीसाठी पीएमसीएच आणि एनएमसीएचमध्ये सुरक्षित बेड ठेवण्यात आले आहेत.(Coronavirus Vaccination: आता 11 एप्रिलपासून सार्वजनिक आणि खासगी कार्यलयाच्या ठिकाणीही मिळणार कोरोना विषाणू लस; केंद्राने दिले निर्देश, जाणून घ्या काय असेल अट)
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने बिहार मध्ये राहणाऱ्या लोकांनी येथे पुन्हा येण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विशेष ट्रेन सुद्धा चालवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील लोकांना घेऊन पहिली विशेष ट्रेन 10 एप्रिलला दानापुर जंक्शन येथे पोहचणार आहे. दानापुर मध्ये सर्व प्रवाशांची चाचणी करण्यासाठी टीम स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासाठी 75 मेडिकल टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या टीम पटना आणि दानापूर जंक्शनवर तपासणी करणार आहेत. दानापूर मध्ये दोन मोठ्या आयसोलेशन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा ठेवले जाणार आहे.