Sonia Gandhi ED News: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ईडी कार्यालयाबाहेर, पहिल्या टप्प्यातील चौकशी संपली

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) ईडी (ED) कार्यालयातून बाहेर पडल्या आहेत. नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी कार्यालयात सुरु असलेल्या चौकशीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पहिल्या टप्प्यात सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी झाली. आता त्यांना चौकशीसाठी पुन्हा सोमावारी (25 जून) बोलवले जाण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जयराम रमेश यांनी म्हटले की, सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला सामोऱ्या गेल्या. त्यांनी ईडीला सांगितले आपले काही प्रश्न असतील तर रात्री आठ वाजेपर्यंत थांबायला तयार आहे. हवे तर उद्याही मी चौकशीला यायला तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. परंतू ईडीकडे कोणतेच प्रश्न नव्हते, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.

सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यामुळे ईडीने पाठवलेल्या आगोदरच्या समन्सनुसार त्यांन चौकशीसाठी उपस्थित राहता आले नव्हते. अखेर त्या आज चौकशीला सामोऱ्या गेल्या. सोनिया गांधी यांनी चौकशीला येताना पुरेशी आरोग्याची काळजी घेतली होती. त्यांनी चेहऱ्याला मास्क लावला होता. तसेच, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे देखील त्यांच्यासोबत होते. सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे आणि इतर मदत देता यावी यासाठी प्रियंका गांधी ईडी कार्यालयात उपस्थित होत्या. मात्र, प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कार्यालयापासून वेगळ्या खोलीत होत्या. (हेही वाचा, National Herald Case: सोनिया गांधी यांची आज ईडीकडून चौकशी, काँग्रेस नेत्यांची देशव्यापी निदर्शने)

दरम्यान, सोनिया गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असताना देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले. महाराष्ट्रातही काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोनिया गांधी यांची चौकशी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा आज पार पडला. त्यांची चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालिका मोनिका शर्मा करत आहेत.