COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत अनेक प्रकार, रूपे बदलली आहेत. या सर्व प्रकारांपैकी सर्वात धोकादायक 'डेल्टा प्रकार' (Delta Variant) आहे, कारण तो खूप जास्त संसर्गजन्य आहे. या प्रकारामुळे व्हायरसच्या इतर सर्व ज्ञात प्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजार होऊ शकतात. व्हायरसचा हा प्रकार कांजिण्या (Chickenpox) सारखे वेगाने पसरू शकतो. अमेरिकेच्या आरोग्य प्राधिकरणाच्या अंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. अहवालात म्हटले आहे की रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) च्या अप्रकाशित डेटाच्या आधारावर सांगितले गेले आहे की, लसीचे सर्व डोस घेतलेले लोकही लसीकरण न झालेल्या लोकांइतके डेल्टा प्रकार पसरवू शकतात.

कोरोनाचा डेल्टा प्रकार हा सर्वप्रथम भारतात आढळला होता. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. वॅलेन्स्की यांनी मंगळवारी कबूल केले की, ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्याप्रमाणेच ज्यांनी लस घेतली आहे त्यांच्या नाक आणि घशात या प्रकारच्या विषाणूची उपस्थिती तशीच राहते. अंतर्गत अहवालाने व्हायरसच्या रूपातील काही गंभीर लक्षणांकडे लक्ष वेधले आहे. डॉक्युमेंटनुसार डेल्टा व्हेरियंट हा  MERS, SARS, इबोला, सामान्य सर्दी, फ्लू सारख्या व्हायरसच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो. तसेच तो कांजिण्यासारखा संसर्गजन्य आहे.

अहवालानुसार, बी.1.617.2 म्हणजेच डेल्टा प्रकार अधिक गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतो. न्यूयॉर्क टाइम्सने एका फेडरल अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, अहवालाच्या निष्कर्षांमुळे सीडीसी शास्त्रज्ञांची डेल्टा प्रकाराबद्दल चिंता वाढली आहे. (हेही वाचा: दिलासादायक! कोरोना विषाणूपासून Covishield देत आहे 93 टक्के संरक्षण; मृत्यूदरामध्ये 98 टक्के घट- AFMC अभ्यास)

अधिकाऱ्याने सांगितले की, सीडीसीला डेल्टा व्हेरिएंटवरील डेटाविषयी खूपच चिंता आहे. हा प्रकार गंभीर धोका निर्माण करू शकतो, ज्यासाठी त्वरिक काही पावले उचलण्याची गरज आहे. सीडीसीने 24 जुलैपर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 162 दशलक्ष लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि दर आठवड्याला सुमारे 35,000 लक्षणे असलेली प्रकरणे समोर येत आहेत.