Captain Amrinder Singh | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress) नेते कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amrinder Singh) हे पंजाब (Punjab) च्या मुख्यमंत्री पदावरुन बाजूला झाल्यानंतर पुढे काय करणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, त्यांची भेट केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झाली. ते पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही भेटले. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजप प्रवेश करणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली. स्वत: अमरिंदर सिंह यांनी मात्र आपण भाजपमध्ये (BJP) जाणार नाही. मात्र काँग्रेसपासून वेगळे होणार असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी NDTV शी बोलताना भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे. अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये होणारा अपमान आता सहन होत नाही. त्यामुळे आपण लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडणार आहोत. 18 सप्टेंबरला कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवले. तेव्हापासून ते काँग्रेस सोडणार अशी अटकळ व्यक्त केली जात होती. अखेर अमरिंदर सिंह यांनी त्या अटकळींवरती शिक्कामोर्तब केले. (हेही वाचा, Amarinder Singh Meets Amit Shah: कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी घेतली अमित शहा यांची भेट, भाजपात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याच्या एक दिवसानंतर अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे की, अजूनही मी काँग्रेस पक्षात आहे. परंतू, पुढे काँग्रेसमध्ये राहणार नाही. कॅप्टननी म्हटले की, माझ्या जवळपास 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच माझ्यावर संशय व्यक्त केला जात आहे. अशा पद्धतीने मी काँग्रेसमध्ये राहू शकणार नाही. काँग्रेस अडचणीत असताना कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखा एक मोठा नेता गमावने पक्षाला आव्हानात्मक ठरेल. याची जाणीव असल्याने काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी आणि कमलनाथ हे अमरसिंह यांची समजूत घालत आहेत. मात्र, अमरींदर सिंह यांनी मंगळवारी दिल्ली येथे आपली पुढची भूमिका जवळपास स्पष्ट केली आहे.

आपल्या नाराजीबाबत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्या ऐवजी त्यांनी भाजप नेते अमित शाह आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार अजित डोभाल आणि अमरिंदर सिंह यांच्यात पंजाब सीमेवरील सुरक्षा आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली.