Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर दिवसागणित नवे रुग्ण समोर येत आहेत. मागील 24 तासांत BSF च्या 11 जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर कालच्या दिवसात 13 कोरोनाग्रस्त जवानांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी या सर्व जवानांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली असून चाचणीचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. या 13 जवानांपैकी 10 जवान त्रिपूरा (Tripura) तर 3 जवान दिल्ली (Delhi) येथील होते. अशी माहिती BSF ने दिली आहे.

कोरोनाग्रस्त जवान आढळल्याने BSF चे दिल्लीमधील मुख्यालय 4 मे रोजी सील करण्यात आले होते. निर्जुंकीकरण प्रक्रीयेनंतर 6 मे रोजी मुख्यालय पुन्हा सुरु करण्यात आले. दरम्यान सीमा सुरक्षा दलातील कोरोना बाधित जवानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर 2 जवानांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. (सीमा सुरक्षा दलातील 2 जवानांचा कोविड 19 च्या संसर्गामुळे मृत्यू)

ANI Tweet:

भारतात मागील 24 तासांत 3,967 नव्या रुग्णांची भर पडली असून 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81,970 वर पोहचली असून एकूण 2,649 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून लॉकडाऊनचा कालावधी आणि स्वरुप लवकरच आपल्या समोर स्पष्ट होईल.