Karnataka BJP Ticket Scam: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीला थोडाथोडका नव्हे तर तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सी. शिवमूर्ती या वयोवृद्ध व्यक्तीने कर्नाटकातील विजयनगर (Vijayanagar, Karnataka) जिल्हा पोलिसांमध्ये रेवन्नासिद्दप्पा आणि एनपी शेखर या दोन व्यक्तींविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. दोघांवरही ₹2.03 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने या दोघांनी आपल्याकडून इतकी रक्कम उकळल्याचा आरोप शिवमूर्ती यांनी केला आहे.
शिवमूर्ती यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका सार्वजनिक कार्यक्रमात आरोपी रेवन्नासिद्दप्पा यांना भेटले. ही जूजबी ओळख पुढे वाढत गेली. त्यातून रेवन्नासिद्दप्पा सतत त्यांच्या संपर्कात राहीला. नियमीतचा परीचय आणि त्याचे विश्वासपूर्ण बोलणे यांतून त्याने भाजपचे तिकीट मिळवून देण्याच्या बदल्यात दोन करोड रुपये देण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. दरम्यान, रेवन्नासिद्दप्पा याच्यामुळे शिवमूर्ती यांची एन.पी.शेकर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोन्ही व्यक्तींनी त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची भेट घडवून आणली. तिथून पुढेच खरी सुरुवात झाली. ऑगस्ट 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीत शिवमूर्ती यांनी आठ हप्त्यांमध्ये भरीव रक्कम सुपूर्द केल्याचा दावा केला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
रेवन्नासिद्दप्पा आणि एनपी शेखर यांच्याविरुद्ध कलम 420, 505 आणि 34 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला असून, आरोपी भाजपशी संबंधित असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवमूर्ती यांनी कथित घटनेच्या सहा महिन्यांनंतर 19 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. भाजपचे तिकीट देण्याचे आश्वासन अपूर्ण राहिल्याने त्यांना पैसे परत मिळण्याची अपेक्षा होती. जेव्हा त्याचा निधी वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याच्याकडे कायदेशीर हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवमूर्ती यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून याप्रकरणी न्याय मागितला आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2023 मध्ये भाजपला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपने ही निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या राज्यात जोर लावला होता पण त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. शेवटच्या काही काळात भाजपने 'जय बजरंग बली' म्हणत हुकमी एक्का वापरुन राजकारण धार्मिक अंगाने रेटण्याचा प्रयत्न केला. परंत तरही भाजपला यश आले नाही. भाजपचा दणदणीत पराभव झाला.