MP Ramesh Bidhuri Controversy: असंसदीय शब्द वापरल्याबद्दल पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांना भाजपची नोटीस
MP Ramesh Bidhuri (Image Credit - Facebook)

लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार कुंवर दानिश अली यांच्या विरोधात असंसदीय शब्द वापरल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रमेश बिधुरी यांनी चांद्रयान-3 मोहिमेवरील चर्चेदरम्यान लोकसभेत बसपा नेते कुंवर दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. दक्षिण दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणारे रमेश बिधुरी यांची टिप्पणी रद्द करण्यात आली आहे. (हेही वाचा - Rahul Gandhi On Women's Reservation Bill: जनगणना आणि 33% महिला आरक्षण तत्काळ लागू करता येऊ शकते- राहुल गांधी)

भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आणि विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी बिधुरी यांच्या संसदेतून निलंबनाची मागणी करत त्यांनी वापरलेली भाषा "संसदेच्या आत किंवा बाहेर वापरली जाऊ नये" असे म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रमेश बिधुरी यांनी सभागृहात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांची "गंभीर दखल" घेतली आणि भविष्यात अशा वर्तनाची पुनरावृत्ती झाल्यास "कठोर कारवाई" करण्याचा इशारा दिला.

पाहा व्हिडिओ -

लोकसभेत असंसदीय भाषेचा वापर करताना, भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप खासदार बिधुरी यांनी बसपा खासदाराला उद्देशून शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे स्पष्ट होते. रमेश बिधुरी यांनी खासदार दानिश अली यांना दहशतवादी संबोधले. रमेश बिधुरी यांनी वापरलेल्या भाषेवर विरोधकांनी आक्षेप घेतला. धक्कादायक म्हणजे भाजपचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे लोकसभेत रमेश बिधुरी यांच्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यावर मागे हसताना दिसले.