भारतीय जनता पार्टी (BJP) चे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची (Coronavirus) लक्षणे आढळली होती. यामुळे त्यांना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पात्रा यांना मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital Gurugram) दाखल केले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार संबित पात्रा यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा पात्रा यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. असे सांगितले जात आहे की, त्यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिसचार्ज दिला.
रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर संबित पात्रा यांनी ट्विट केले की, 'तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व प्रार्थनेने मी बरे झाल्यावर माझ्या घरी परतलो आहे. पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. तुमच्या आशीर्वादाबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.’ तसेच आपल्या पक्षाबद्दल ते म्हणाले. ‘माझ्या आजारपणात ज्या प्रकारे माझ्या पक्षाने माझी ‘आई’ म्हणून काळजी घेतली.. पक्षाचे नेतृत्व नेहमीच म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले आहे.. मी आज भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, माझा पक्षच माझे कुटुंब आहे.’ (हेही वाचा: भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये आढळली कोरोना व्हायरसची लक्षणे; रुग्णालयात दाखल)
28 मे रोजी संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व पुढे 10 दिवस त्यांच्यावर उपचार चालले. देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असण्याव्यतिरिक्त, पात्रा हे एक सर्जन आहेत. त्यांनी हिंदूराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. ओएनजीसीच्या मंडळावर पात्रा हे नॉन ऑफिशियल डायरेक्टर्स पैकी एक आहेत. मूळचे ओडिशाचे रहिवासी असलेल्या पात्रा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. मात्र ते बिजू जनता दलाचे उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून 11,700 मतांनी पराभूत झाले. संबित पात्रा हा न्यूज चॅनेल्सवर दिसणारा भाजपाचा लोकप्रिय चेहरा आहे. ते सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहेत.