
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नुकताच दोन दिवसांचा जम्मू दौरा पार पडला. गुरुवारी जम्मूला पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम माता वैष्णोदेवीचे (Vaishno Devi) दर्शन घेतले. राहुल गांधी हे कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मूचा दौरा करत होते. राहुल गांधी यांच्या वैष्णोदेवी यात्रेमुळे बरेच राजकारण होते. आता राहुल गांधी जम्मूहून परतल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या जम्मू-काश्मीर युनिटच्या कार्यकर्त्यांनी, बुधवारी वैष्णो देवी यात्रा ट्रॅकवर गंगाजल (Gangajal) शिंपडून त्याचे 'शुद्धीकरण' केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अरुण जामवाल यांचा आरोप आहे की, राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी वैष्णो देवीच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे झेंडे आणले आणि राजकीय घोषणाही दिल्या. यामुळे वैष्णो देवी धामच्या पावित्र्याचे उल्लंघन झाले आहे म्हणूनच ते गंगाजल शिंपडून यात्रा ट्रॅकचे 'शुद्धीकरण' करत आहेत.
अरुण जामवाल म्हणाले, 'हे धाम एक पवित्र ठिकाण आहे, जिथे फक्त मा वैष्णो देवीचे नामस्मरण होते. पण, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांनी येथे येऊन राजकारण केले. त्यांनी पक्षाचे झेंडे फडकवले आणि सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या नावाने घोषणाही दिल्या.
दुसरीकडे यात्रा मार्गावर गंगाजल शिंपडल्याबद्दल काँग्रेस पक्षाने भाजपला माफी मागण्यास सांगितले आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलचा अपमान केला आहे. शूज आणि चप्पल घालून गंगाजल शिंपडण्यात आले. एवढेच नाही तर, राहुल गांधींच्या आगमनावर, कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या कटराची जमीन भाजपने अशुद्ध केली. (हेही वाचा: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात विजय रुपाणी सरकारमधील मंत्र्यांना डच्चू; 8 पटेल, 6 OBC यांच्यासह 24 मंत्र्यांनी घेतली शपथ)
पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, काँग्रेसचे खासदार कटरा येथे केवळ देवीच्या दर्शनासाठी आले होते, जिथे ते राजकारणाबद्दल काही बोलले नाही. जम्मूपासून कटरा आणि जुन्या दारुड गावापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत पक्षाचे झेंडे फडकावले, पण भाजप क्षुद्र राजकारण करत आहे. भाजपचे नेते हेलिकॉप्टरने दर्शनासाठी येतात आणि व्हीआयपी म्हणून जातात, पण राहुल गांधींनी पायी चालत जाऊन देवीचे दर्शन घेतले, हीच गोष्ट भाजपला खटकली.