PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये नव्याने बांधलेल्या 'बिप्लबी भारत गॅलरीचे' उद्घाटन केले. यावेळी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी बंगालमधील बीरभूम (Birbhum) घटनेबद्दल देखील शोक व्यक्त केला. या प्रकरणांतील गुन्हेगारांना राज्य सरकार शिक्षा देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यासह पीएम मोदी म्हणाले, 'मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करेन की, अशा घटना घडवणाऱ्यांना किंवा जे अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देतात त्यांना कधीही माफ करू नका.'

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने मी राज्याला आश्वासन देतो की, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी जी मदत हवी आहे ती केली जाईल. मंगळवारी पहाटे बीरभूममधील रामपूरहाटमधील बोगतुई गावात डझनभर घरांना आग लागल्याने दोन मुलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) पंचायत स्तरावरील नेते भादू शेख यांच्या कथित हत्येच्या काही तासांतच ही घटना घडली.

भारतीय जनता पक्षाने हिंसाचारासाठी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस समर्थित 'गुंडांना' जबाबदार धरले आहे. त्याच वेळी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, बीरभूम जिल्ह्यात हिंसाचार पसरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरीही. या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Air India ची दुर्दशा होण्यास यूपीए सरकार जबाबदार- ज्योतिरादित्य सिंधिया)

या हिंसाचारानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. बैठकीनंतर पश्चिम बंगालचे भाजप नेते सुकांता मजुमदार म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते 72 तासांत बीरभूम घटनेचा अहवाल मागतील, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक टीम नियुक्त केली जाईल.’ दुसरीकडे, कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी (24 मार्च 2022) दुपारी 2 वाजेपर्यंत घटनेचा अहवाल देण्यास सांगितले आहे.