बिहारमधील (Bihar) भागलपूरमधून (Bhagalpur) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. गावातील काही महिला आपल्या शेतात शौचास (Defecate) जावून आपले पीक जाणूनबुजून खराब करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने मंडळ कार्यालयात केली आहे. चंदरदेव मंडल असे शेतकऱ्याचे नाव आहे. महिलांच्या या कृत्याने त्याला प्रचंड दु:ख आणि नुकसान होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
चंदरदेव मंडल याने मंडळ अधिकाऱ्यांना लिहिले की, ‘घरात शौचालय असूनही काही महिला दररोज त्यांच्या शेतात शौचास येतात. सर्व स्त्रिया हे कृत्य दुर्भावनापूर्ण करतात. त्या ठिकाणी इतर लोकांचे शेत आहेत, परंतु त्या दुसऱ्याच्या शेतात न जाता फक्त आपल्याच शेतात येतात. कारण त्यांना आपले पीक खराब करायचे आहे.’
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ही घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील पिरपेंटी पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथील आहे. चंदरदेव मंडल सांगतात, आजूबाजूला बरीच शेते आहेत, मात्र या महिला त्यांचे गव्हाचे पीक खराब करण्यासाठी त्यांच्या शेतात दररोज शौचास बसतात. याला विरोध केल्यावर या महिलांचे पती चंद्रदेवाशी भांडण सुरु करतात. पिरपेंटीच्या मंडळ अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार शेतात शौच करणाऱ्या 6 महिलांच्या पतींची नावेही यात नमूद करण्यात आली आहेत. चंदरदेवने या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: PM Kisan 13th Installment: मोठी घोषणा! 'या' दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या पीएम किसान निधी खात्यात पैसे)
चंदरदेव यांच्या भावाचा मुलगा विनय मंडल याने सांगितले की, त्यांच्या मोठ्या काकांनी महिलांना खूप समजावले, पण त्यांनी ऐकले नाही, त्यानंतर त्यांनी मंडळ कार्यालयात तक्रार केली. या घटनेची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मंडळ कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी गावात येऊन महिलांना चंदरदेव मंडलच्या शेतात शौचास न जाण्याचे व घरातील शौचालयाचा वापर करण्याचे आदेश दिले. परंतु यानंतरही त्या महिला मंडल यांच्या शेतात शौच करण्यावर ठाम असल्याचे शेतकरी सांगतात.