बिहारमधील (Bihar) समस्तीपूर-बरौनी रेल्वे सेक्शनच्या उजियारपूर स्टेशनजवळ एक रेल्वे प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली पडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जखमी प्रवाशाने टीटीईवर (Train Ticket Examiner) चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रेल्वे प्रवासी हा सुगौली पोलीस स्टेशन हद्दीतील भाथर टिकुलिया पंचायतीमधील रहिवासी असून त्याचे नाव, नवल प्रसाद असे आहे. हा प्रवाशी हावडा येथे जात होता.
अहवालानुसार, रविवारी संध्याकाळी नवल प्रसाद रक्सौलहून हावडाकडे जाणाऱ्या मिथिला एक्स्प्रेसने कोलकात्याला जात होता. यादरम्यान तो चुकून सामान्य डब्याऐवजी स्लीपर बोगीत चढला. उजियारपूर रेल्वे स्थानकाजवळील स्लीपर कोचमध्ये टीटीईने त्याच्याकडे तिकीट मागितले. यावर नवलने सांगितले की, त्याच्याकडे सामान्य तिकीट आहे आणि तो चुकून स्लीपर कोचमध्ये चढला होता. पुढच्या स्टेशनवर उतरून जनरल बोगीत जाऊ, असेही त्याने टीटीईला सांगितले.
यावर टीटीईने त्याला लगेच स्लीपर बोगीतून खाली उतरण्याचे आदेश दिले. नवल प्रसादने हात जोडून पुढच्या स्टेशनवर उतरून जनरल बोगीत जाऊ असे सांगितले. यावर टीटीई इतका संतप्त झाला की त्याने त्याला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी घाईघाईने त्याला उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल केले. त्यानंतर त्याची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. या अपघातात पीडितेला गंभीर दुखापत झाली असून, त्याचा पाय कापला गेला आहे. (हेही वाचा: Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये ED च्या अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक, आरोपीला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी)
या संपूर्ण प्रकरणाबाबत रेल्वे स्थानक प्रमुखांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना बोगी बदलताना एक प्रवाशी पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. आता टीटीईची क्रूरता उघडकीस आल्यानंतर रेल्वेकडून कारवाईची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी सोनपूर रेल्वे विभागाचे डीआरएम विवेक भूषण यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून टीटीई दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.