Arrested

बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बेतियाच्या नरकटियागंज येथे एका वृद्धाला अमिताभ बच्चन यांचा अभिनय करणे महागात पडले आहे. नातवाच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टीत आजोबा दारूची रिकामी बाटली घेऊन नाचत होते. यावेळी 'मुझे नौलखा मंगा दे रे..’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला होता. हातात रिकामी दारूची बाटली घेऊन अमिताभ बच्चनचा अभिनय करत आजोबा गाण्याचा आनंद घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी रविवारी या आजोबांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सैदपूर येथील रहिवासी रमेश कुमार सिंह यांच्या घरी नातवाच्या सहाव्या वाढदिवसाची पार्टी होती. यावेळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या खास प्रसंगाच्या आनंदात आजोबा दारूची रिकामी बाटली घेऊन ऑर्केस्ट्रामधील तरुणीसोबत नाचू लागले. या गोष्टीचा व्हिडिओ कोणीतरी शूट करून व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच शिकारपूर पोलिसांनी कारवाई करत रमेश कुमार सिंगला अटक केली.

बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू असून दारूची रिकामी बाटली सापडली तरी पोलीस कारवाई करतात. बिहारमध्ये दारूची बाटली बाळगणे हा गुन्हा आहे. या कारणामुळे आजोबांना अटक झाली. हा व्हिडिओ 16 जानेवारीचा आहे. मात्र तो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी त्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवले. रमेशने खरच दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी झाली नाही. (हेही वाचा: बेंगळुरूमध्ये 3 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यासह दोन नायजेरियन लोकांना अटक)

दरम्यान, बिहारमध्ये 5 वर्षांहून अधिक काळ दारूबंदी लागू असूनही दारू तस्कर वेगवेगळ्या युक्त्या अवलंबून राज्यात दारूचा धंदा करत आहेत. ताजे प्रकरण नालंदाशी संबंधित आहे. नालंदाच्या हिलसा ब्लॉकच्या सरकारी शाळेत दारूचा धंदा तेजीत होता. हिलसा पोलिसांनी छापा टाकून प्राथमिक शाळा धरमपूरच्या आवारातून मोठ्या प्रमाणात कच्ची दारू जप्त केली. पोलिसांच्या छाप्यामध्ये दारू व्यावसायिक फरार होण्यात यशस्वी झाला.