Bihar Assembly Elections 2020:  सगळ्याच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी, बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी अनेकांचे 'गुडघ्याला बाशिंग', प्रत्येकाची तऱ्हा निराळी
Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निवडणूक आणि राजकीय पक्ष कोणताही असो. सर्व पक्षांमध्ये इच्छुकांच्या तऱ्हा सारख्याच. नुकत्याच घोषणा झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Elections 2020) मध्येही याची पूरेपूर प्रचिती येत आहे. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal), नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा संयुक्त जनता दल ( Janata Dal United), राष्ट्रीय दर्जाचे काँग्रेस (Congress), भाजप (BJP) असो की जीतन राम मांझी, राम विलास पासवान यांचा लोकजनशक्ती अथवा इतर छोटा मोठा कोणताही पक्ष असो. सर्वच पक्षांमध्ये आमदारकीच्या उमेदवारी तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची बहुगर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिकीट मिळावे यासाठी हे इच्छुक आपापल्या नेत्यांवर लॉबिंग करत आहेत. दबाव टाकत आहेत. या इच्छुकांच्या तऱ्हा पाहून मतदारांचे मनोरंजन तर नेत्यांसमोर मात्र चांगलाच पेच निर्माण होत आहे.

पक्षाशिस्तीबाहेर जाऊन तिकीट मागणी

ज्या मंडळींना पक्ष अथवा नेतृत्वाकडून तिकीट मिळविण्याचे अश्वासन मिळाले आहे. ते लोक सध्या सातव्या मजल्यावर (सातवे आस्मान) आहेत. परंतू, ज्यांना असे ठोस अश्वासन मिळाले नाही ते लोक मात्र आपली मागणी पक्षासमोर रेटत आहेत. काही लोक पक्षाच्या शिस्ती अथवा रेषेबाहेर जाऊन हटके पद्धतीने तिकीट मागत आहेत.

'तिकीट द्या त्याशिवाय उठणार नाही'

राष्ट्रीय जनता दल (राजद) कार्यालयाबाहेर एक महिला पक्षाने तिकीट द्यावे म्हणून धरणे धरुण बसली. ही महिला बेगुसराय जिल्ह्यातील तेघडा विधानसभा क्षेत्रातलील असून नेत्री सुधा सिंह असे तिचे नाव आहे. तिने सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. नेत्री सुधा सिंह यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की, तेजस्वी यादव आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला. परंतू, भेट होऊ शकली नाही. सन 2015 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला तिकीट देण्याचे अश्वासन दिले होते. परंतू आम्हाला तिकीट मिळाले नाही. पक्ष जोर्यंत आपल्याला तिकीट देत नाही तोपर्यंत आपण इथेच बसणार असल्याचेही या महिलेने सांगितले. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020: अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित? बिहार निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाच्या फायद्याची?)

भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची अडवली गाडी

दरम्यान, दुसऱ्या बाजूला भाजप कार्यालयाबाहेर रविवाही वेगळाच 'हंगामा' पाहायला मिळाला. लखीसराय येथील उमेदवार बदलल्यामुले हा गोंधळ निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांची गाडीही अडवली. सुशील मोदी यांना आपल्या वाहनातून कार्यालयातही पोहोचता आले नाही. या वेळी कार्यालयात असलेले कार्यकर्ते आणि आंदोलक कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची आणि धराधरीही झाल्याचे समजते.

दरम्यान, इतरही राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची बहुगर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोक आंदोलन करत आहेत, काही लोक धरणे धरुन बसले आहेत. काही मंडळींनी इतर मर्गांनीही आंदोलन सुरु केले आहे. काही लोक थेट पक्षविरोदी काम करण्याची धमकीही नेतृत्वाला देत आहेत.